न्यूझीलंडची पराकोटीची खिलाडूवृत्ती, बेन स्टोक्सला ‘न्यूझीलंडर ऑफ द ईयर’चं नामांकन
क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडच्या ज्या खेळाडूने न्यूझीलंडचा विजय हिसकावला, त्याच बेन स्टोक्सला न्यूझीलंडने ‘न्यूझीलंडर ऑफ द ईयर’ या पुरस्कारासाठी नामांकित केलं आहे.
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती किती पराकोटीची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडच्या ज्या खेळाडूने न्यूझीलंडचा विजय हिसकावला, त्याच बेन स्टोक्सला न्यूझीलंडने ‘न्यूझीलंडर ऑफ द ईयर’ या पुरस्कारासाठी नामांकित केलं आहे. यापेक्षा आश्चर्यकारक म्हणजे याच पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही नामांकन मिळालं आहे.
ज्या खेळाडूने न्यूझीलंडचा वर्ल्डकप हिरावला, त्याच इंग्लंडच्या बेन स्टोक्सला न्यूझीलंडच्या सर्वोच्च पुरस्काराचं नामांकन देण्यामागचं कारणही जबरदस्त आहे. बेन स्टोक्सचे आई-वडील हे न्यूझीलंडचे आहेत. स्टोक्सचा जन्मही न्यूझीलंडमध्येच झाला.
बेन स्टोक्सचे वडील गेरार्ड आणि त्याची आई डेब हे आजही न्यूझीलंडमधल्या ख्राईस्टचर्चमध्ये राहतात. बेन त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षी वडीलांसोबत इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. पुढे एक क्रिकेटर म्हणून तो घडला आणि खेळलाही इंग्लंडसाठीच. बेन स्टोक्सनं 14 जुलैला लॉर्डच्या मैदानात विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडला विश्वचषक जिंकून देऊन नवा इतिहास घडवला. स्टोक्सच्या नाबाद 84 धावांच्या खेळीने इंग्लंडला विश्वचषकाची फायनल पहिल्यांदा टाय करून दिली. मग सुपर ओव्हरमध्येही त्यानं नाबाद आठ धावा फटकावल्या. अखेर सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेतेपद देण्यात आलं.
बेन स्टोक्सला नामांकन का?
न्यूझीलंडर ऑफ द ईयर पुरस्कार समितीचे प्रमुख कॅमरन बॅनेट यांनी बेन स्टोक्सला सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन देण्यामागील कारण सांगितलं. “स्टोक्स भलेही न्यूझीलंडकडून खेळला नाही, मात्र त्याचा जन्म ख्राईस्टचर्चमध्ये झाला आहे. इथेच त्याचे आई-वडील राहतात”.
या पुरस्कारासाठी स्टोक्स, विल्यमनसशिवाय अन्य पाच जणही शर्यतीत आहेत.
संबंधित बातम्या
पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळण्याची इच्छा नाही : बेन स्टोक्स
… म्हणून विश्वविजेता इंग्लंडच्या विजयानंतरही बेन स्टोक्सचे वडील नाराज
World Cup Final : बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनची माफी मागितली
एकाकी झुंजला, वाघासारखं लढला, न्यूझीलंडमध्ये जन्मलेला बेन स्टोक्सने इंग्लंडला जिंकवलं!