VIDEO: मॅचदरम्यान स्टेडियम बाहेर भेळ, भुईमुगाच्या शेंगा विकणारा पठ्ठ्या कोण?
भारतात बहुतांश सर्वांनाच भुईमुगाच्या शेंगा आणि भेळ खायला आवडते. हीच आवड भारताबाहेर गेल्यावर पूर्ण करणे कठीण होऊन जाते. मात्र, लंडनच्या रस्त्यांवर यावेळी काहीसे वेगळेच चित्र आहे.
लंडन : भारतात बहुतांश सर्वांनाच भुईमुगाच्या शेंगा आणि भेळ खायला आवडते. हीच आवड भारताबाहेर गेल्यावर पूर्ण करणे कठीण होऊन जाते. मात्र, लंडनच्या रस्त्यांवर यावेळी काहीसे वेगळेच चित्र आहे. भारतीयांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लंडनच्या रस्त्यांवर सध्या भारताप्रमाणेच भुईमुगाच्या शेंगा आणि भेळ विकणारे स्टॉल्स लागले आहेत. हे विक्रेते दुसरे तिसरे कुणीही नसून भारतावर राज्य करणारे ब्रिटीशच आहेत.
इंग्लंडमध्ये वर्ल्डकप सुरु असून स्टेडियम बाहेर एक ब्रिटीश नागरिक गरमागरम भुईमुगाच्या शेंगा विकताना दिसत आहे. या शेंगा खाण्याचा मोह कवी आणि आपचे नेते कुमार विश्वास यांनाही झाला. त्यांनीही या शेंगा घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. एकेकाळी भारतावर राज्य करणारे आज भारतीयांसाठीच शेंगा विकत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. कुमार विश्वास यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी शेंगा विक्रेत्या ब्रिटीश नागरिकाला हे काय असल्याचे विचारले. त्यावर तो ‘गरम..गरम…मूंगफली’ असं म्हणताना दिसत आहे.
??? लंदन के मूँगफली विक्रेता ??? pic.twitter.com/lWLvCgF0lU
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) June 10, 2019
या व्यतिरिक्त अन्य एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ क्रिकेट विश्लेषक सुनंदन लेले यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत एक ब्रिटीश नागरिक भेळ विकताना दिसत आहे. अगदी भारतीय पद्धतीनेच एका पाटीत भेळ विक्रीचे सर्व साहित्य ठेवलेले असून तो अगदी सराईतपणे भेळ तयार करुन विक्रीचे काम करताना पाहायला मिळाला. तो ग्राहकांना एका पुस्तकाच्या पानांमध्ये अगदी भारतीय स्टाईलने भेळ विकत असल्याने भारतीयांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
आेव्हल मैदानावर भेळेची गाडी ??? pic.twitter.com/HoZlDXMInS
— Sunandan Lele (@sunandanlele) June 10, 2019
लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे नागरिक राहतात. या व्यतिरिक्त वर्ल्डकप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय लंडनमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे तेथे भारतीय खाद्य पदार्थांची मागणी चांगलीच वाढली आहे. त्यामुळेच अशी दृष्ये दिसत आहेत.
संबंधित बातम्या:
नारायणगावचा पठ्ठ्या ओव्हल मैदानात गरजला, छत्रपती संभाजी महाराज की…जय!