भारताच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूवर फसवणूक प्रकरणी आरोपपत्र
भारतीय क्रिकेट संघाला ‘अंडर-19 वर्ल्ड कप’ जिंकून देणारा खेळाडूवर वयात फेरफार केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे.
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाला ‘अंडर-19 वर्ल्ड कप’ जिंकून देणारा खेळाडूवर वयात फेरफार केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे. मनज्योत कालरा असे या खेळाडूचे नाव आहे. त्याने भारताला 2018 चा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोठी भूमिका निभावली होती.
मनज्योत कालराने 2018 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात 101 धावांची दमदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात तो सामनावीरही ठरला होता. कालराच्या या खेळीने भारतीय संघाने चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले होते.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात मनज्योत कालराने त्याचे वय 1 वर्ष कमी करुन सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
अंडर 19 क्रिकेट मालिकेसाठी वयात फेरफार
मनज्योत कालराचा भारतीय क्रिकेट संघांच्या अंडर 19 क्रिकेट मालिकेत सहभागी होता यावे म्हणून त्याचे वय कमी करण्यात आल्याचे समोर येत आहे. यासाठी त्याच्या कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आले. हे सर्व कालराच्या आई-वडिलांनी केल्याचा आरोप आहे. आता हे प्रकरण न्यायालयात आहे.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाला सांगितलेली जन्मदिनांक (BCCI) आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्मदिनांक वेगवेगळी असल्याचे तपासात समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी तीस हजारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार कालराची मुळ जन्मदिनांक 15 जानेवारी 1998 आहे. मात्र, BCCI ला दिलेल्या कागदपत्रांमध्ये ती 15 जानेवारी 1999 सांगण्यात आली आहे.
आरोपपत्रात कालराच्या आई-वडिलांचाही उल्लेख
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात कालराचे वडिल परवीन कुमार आणि आई रंजीत कौर यांच्या नावाचाही उल्लेख आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे, ‘मुलगा मनज्योत कालराला दिल्ली संघात खेळवण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याची जन्मदिनांक बदलवली. त्यांनी मनज्योतच्या जन्म प्रमाणपत्रात बदल केले यात कोणतीही शंका नाही.’
मनज्योतच्या वडिलांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, “मनज्योतची जन्मदिनांक शाळेत चुकीची लिहिली गेली होती. त्यानंतर त्यात दुरुस्ती करुन जन्म वर्ष 1999 करण्यात आले.
माजी खासदार आणि क्रिकेटर किर्ती आझाद यांनी 4 वर्षांपूर्वी 2014-15 मध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विशेष तपास पथकाने याचा तपास केला.