87 वर्षीय फॅनला दिलेला शब्द कोहलीने दोन दिवसात पाळला!
विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात एक 87 वर्षीय फॅनने सर्वांचं लक्ष वेदून घेतलं होतं. चारुलता पटेल या आजीबाईंनी या सामन्याला हजेरी लावली होती.
लंडन : विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात एक 87 वर्षीय फॅनने सर्वांचं लक्ष वेदून घेतलं होतं. चारुलता पटेल या आजीबाईंनी या सामन्याला हजेरी लावली होती. भारताने हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी चारुलता पटेल यांच्याजवळ जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. महत्त्वाचं म्हणजे कपिल देव यांच्या नेतृत्त्वात भारताने 1983 मध्ये जेव्हा वर्ल्डकप जिंकला होता, त्यावेळीही चारुलता पटेल यांनी हा सामना पाहिला होता.
मंगळवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात चारुलता पटेल यांनी भारताकडून जल्लोष केला. तिरंगा स्कार्फसह पिपाणी (वुवुजेला) वाजवणाऱ्या आजीबाई सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या. वर्ल्डकप आयोजकांनी प्रेक्षक गॅलरीत जाऊन त्यांची मुलाखतही घेतली. त्यावेळी चारुलता पटेल यांचं वय 87 असल्याचं समजल्यावर कॉमेंट्री करणारा माजी कर्णधार सौरव गांगुलीही आश्चर्यचकीत झाला होता.
पहिला वर्ल्डकप
चारुलता पटेल यांच्याबाबत अनोखा योगायोग आहे. चारुलता यांनी भारताने जिंकलेला पहिला वर्ल्डकपही पाहिला होता. त्यावेळी त्यांचं वय 50 च्या आसपास होते. त्यावेळी त्यांनी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा वर्ल्डकपचा अंतिम सामना टीव्हीवर पाहिला होता. आता विराट कोहलीनेही विश्वचषक जिंकावा अशी त्यांची इच्छा आहे.
विराट कोहलीचं आश्वासन
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चारुलता पटेल यांच्याकडे जाऊन विराट आणि रोहितने त्यांचे आशीर्वाद घेतले होते. चारुलता यांनीही दोघांना भरभरुन आशीर्वाद दिला. त्यावेळी विराटने चारुलता यांना पुढच्या सामन्यांमध्येही आम्ही तुम्हाला प्रेक्षक गॅलरीत पाहू इच्छितो, अशी इच्छा व्यक्त केली.
त्यावर चारुलता पटेल यांनी माझ्याकडे तिकीट नाही, त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये मी येऊ शकणार नाही असं सांगितलं. कोहलीने त्यांची अडचण समजून, मी तुम्हाला पुढची सर्व तिकीटं देईन असं आश्वासन दिलं. याशिवाय महिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही त्यांना तिकीटची ऑफर दिली.
दोन दिवसात आश्वासन पाळलं
कोहलीने चारुलता यांना केवळ आश्वासन दिल नाही तर अवघ्या काही तासात पाळलंही. टाईम्स ऑफ इंडियाने चारुलता पटेल यांच्या नातीशी फोनवरुन बातचीत केली. त्या म्हणाल्या, “विराट आणि रोहितने मंगळवारी आजीची भेट घेत, पाया पडून आशीर्वाद घेतले. त्यावेळी विराटने सर्व मॅचला उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र आजीने तिकीटं नसल्याचं सांगताच, विराटने काळजी करु नका मी तिकिटाची व्यवस्था करेन असं सांगितलं. विराटने दिलेला शब्द दोन दिवसात पाळला. त्याने आमच्यासाठी भारताच्या सर्व सामन्यांची तिकीटं पाठवली आहेत. 6 जुलैला लीड्समध्ये होणारा श्रीलंकेविरुद्धचा सामना, दोन्ही सेमीफायनल आणि फायनलचं तिकीट आम्हाला मिळालं”
कोण आहेत चारुलता पटेल?
भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात एक 87 वर्षीय फॅनने सर्वांचं लक्ष वेदून घेतलं होतं. तरुणांप्रमाणेच हा सामना बघण्यासाठी एका 87 वर्षाच्या एका आजींनी हजेरी लावली. चारुलता पटेल असे या आजीचे नाव असून सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
माझा जन्म टांझानिया या देशात झाला असून आईवडील हे भारतीय आहे. माझे वय 87 वर्षे आहे. माझ्या मुलांना क्रिकेट खेळायला आवडते. त्यामुळे मलाही क्रिकेटची फार आवड आहे. माझा जन्म भारतातील नसला, तरीही माझ्या आईवडीलांचा जन्म भारतातील आहे. म्हणूनच मला माझ्या देशाचा सार्थ अभिमान आहे. गेल्या 20 वर्षापासून मी क्रिकेट बघते आणि क्रिकेटपटूंना मी माझ्या मुलांप्रमाणेच मानते असेही चारुलता आजींना प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
How amazing is this?!
India’s top-order superstars @imVkohli and @ImRo45 each shared a special moment with one of the India fans at Edgbaston.#CWC19 | #BANvIND pic.twitter.com/3EjpQBdXnX
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 2, 2019
संबंधित बातम्या
VIDEO : मराठी दिसणाऱ्या टांझानियाच्या आजीचा टीम इंडियाला सपोर्ट का?