गेलने भारताविरुद्ध फक्त 11 धावा केल्या, पण लाराचे दोन विक्रम मोडले
ख्रिस गेल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराचा विक्रम गेलने मोडित काढला
मुंबई : वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) याने ब्रायन लारा (Brian Lara) चे दोन विक्रम एकाच सामन्यात मोडित काढले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याचा मान गेलने पटकावला आहे. सोबतच तो विंडीज संघाचा सर्वाधिक वनडे सामने खेळणारा क्रिकेटपटूही ठरला आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात सात धावा रचून इतिहास रचल्यानंतर गेल 11 धावांवर माघारी परतला.
39 वर्षांचा ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल हा वेस्ट इंडीज क्रिकेट संघासाठी 300 एकदिवसीय सामने खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्यासाठी विंडीज संघाने गेलचं खास सेलिब्रेशनही केलं. याआधी ब्रायन लाराने विंडीजसाठी सर्वाधिक (295) वनडे सामने खेळले होते.
तीनशेव्या सामन्यात गेलने लाराचा आणखी एक विक्रम मोडित काढला. ब्रायन लाराने वनडेमध्ये 10 हजार 348 धावा (295 वनडे सामने) करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज ठरण्याचा विक्रम रचला होता. आता 10 हजार 353 धावा (300 वनडे सामने) ठोकणाऱ्या गेलच्या नावे हा विक्रम जमा झाला.
भारताविरुद्ध त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेनवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात गेलने या विक्रमाला गवसणी घातली. लाराचा रेकॉर्ड मोडण्यासाठी गेलला केवळ सात धावांची आवश्यकता होती. भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातच गेलला हा विक्रम रचता आला असता, मात्र 31 चेंडूंमध्ये त्याला केवळ चारच धावा करता आल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी गेलच्या नाकी नऊ आणले होते. अखेर कुलदीप यादवने गेलला तंबूत धाडलं.
Top 10 Most caps for West Indies in ODIs! ?? pic.twitter.com/UkO1vcIsIN
— Windies Cricket (@windiescricket) August 11, 2019
‘मी खूपच मोठा पल्ला गाठला आहे. मी कधी हा टप्पा ओलांडेन, असा विचारही केला नव्हता. तीनशे सामना खेळायला मिळत आहे, यासाठी मी देवाचे आभार मानतो. मला या फॉर्मेटमध्ये खेळण्याचा आनंद मिळत होता, यात शंकाच नाही’ अशा भावना गेलने व्यक्त केल्या आहेत.
The Universe Boss @henrygayle had this to say ahead of his 300th ODI match for the West Indies!???#MenInMaroon #ChrisGayle pic.twitter.com/nxKNgpBO0r
— Windies Cricket (@windiescricket) August 11, 2019
विश्वचषकानंतर गेलने निवृत्तीचा मानस बोलून दाखवला होता. मात्र त्यानंतर भारताविरुद्ध शेवटची वनडे मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त गेलने संन्यास घेण्याचा निर्णय टाळला.
गेल नुकताच ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये वॅनकुअर नाईट्स संघात सहभागी झाला होता. टूर्नामेंटमध्ये त्याने पाच डावात 277 धावा ठोकल्या होत्या.