Gautam Gambhir : कोच-खेळाडूंमधील वाद… गौतम गंभीरने प्रथमच सोडलं मौन
भारत वि ऑस्ट्रेलिया मधील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारी सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये भारतीय संघ 1-2 अशा पिछाडीवर आहे. मात्र सिडनीमधील मॅचपूर्वी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद झाल्याची बातमी समोर आली होती. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये बरीच उलथापालथ झाली, पर्थ कसोटीत बुमराह कर्णधार बनावा अशी काहींची इच्छा नव्हती असेही समोर आले होते.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील 5 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचं प्रदर्शन खराब आहे. या सीरिजमध्ये भारतीय संघ 1-2 अशा पिछाडीवर असून ऑस्ट्रेलियाची आघाडी दिसत आहे. या मालिकेतील 5 वा आणि अखेरचा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होणार असून ती कसोटी जिंकून ही मालिका 2-2 अशी बरोबरीमध्ये सोडवण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आता आहे. याचदरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये तणावाचं वातावरण असून काही वाद झाल्याच्या बातमी समोर आल्या होत्या आणि त्यामुळेच नव्या चर्चांना तोंड फुटलं होतं. ड्रेसिंग रुमच्या आतली गोष्ट बाहेर आल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता ड्रेसिंग रूममधील या वादावर भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरने त्याचं मौन सोडलं आहे.
कोच आणि खेळाडूंमध्ये काय बोलणं होतं, या गोष्टी ड्रेसिंग रूमच्या आतच राहिलेल्या चांगलं असतं असं म्हणत प्रेस कॉन्फरन्समध्ये गंभीरने बरंच सुनावलं आहे. ड्रेसिंग रूममध्ये जोपर्यंत ईमानदार लोक आहे तोपर्यंत भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात असेल अशी टिपण्णीदेखील गंभीरने केली आहे. त्याच्या या विधानाचे आता काय पडसाद उमटतात याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे
उद्या अर्थात 3 जानेवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना सुरू होत असून हाँ सामना जिंकून मालिका बरोबरीत (2-2) असे सोडवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहेच. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला सिडनी टेस्ट जिंकावी लागणार आहे. मात्र, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा 2-0 किंवा 1-0 असा पराभव केल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल.
काय आहे ड्रेसिंग रूम वाद ?
मिडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियात काहीही ठीक नाहीये, तिथे बरंच काही घडलं आहे. चौथ्या कसोटीतील पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये बराच राडा झाला. मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर कोच गौतम गंभीर हे खेळाडूंवर प्रचंड भडकले होते. पराभवानंतर गौतम गंभीरने रोहित शर्मा-विराट कोहली सारख्या सीनियर खेळाडूंसह सर्वांनाच झापल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता बास झालं, मी इतके दिवस काहीच बोललो नाही याचा अर्थ मलाा गृहीत धरलं जावं असा होत नाही, असेही गंभीर म्हणाल्याचे समोर आले होते.
एवढंच नव्हे तर पर्थ कसोटीत जसप्रीत बुमराह कर्णधार बनावा अशी काहींची इच्छा नव्हती असेही काही रिपोर्टसमध्ये असेही नमूद करण्यात आले होते. एक खेळाडू बुमराहला कर्णधार करण्याच्या विरोधात असल्याचे समोर आले होते. दरम्यान ड्रेसिंग रुममधील बातम्या लीक झाल्याने माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने नाराजी व्यक्त केली होती. ड्रेसिंग रुममध्ये जे घडतं ते बाहेर येता काम नये, असा सल्ला इरफान पठाणने दिला होता. आणि आता गौतम गंभीर यानेही या विषयावर मौन सोडत ड्रेसिंग रूममधील बातम्या बाहेर पडल्याने नाराजी व्यक्त केली. कोच आणि खेळाडूंमध्ये काय बोलणं होतं, या गोष्टी ड्रेसिंग रूमच्या आतच राहिलं तर बरं असं त्याने म्हटलं आहे.