नवी दिल्ली : आजपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2022) सुरू होत आहेत. भारतीय खेळाडू आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. पीव्ही सिंधू ध्वजवाहक असतील. राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताला नीरज चोप्राच्या रूपाने मोठा धक्का बसला. नीरज दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत आता भारताची संपूर्ण जबाबदारी पीव्ही सिंधू, मनिका बत्रा, मीराबाई चानू, लवलिना, निखत जरीन, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यावर आली आहे. आज (28 जुलै) भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल. त्याचवेळी 29 जुलैपासून भारतीय खेळाडू आपले आव्हान सादर करतील. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं (India) आतापर्यंत 181 सुवर्ण, 173 रौप्य, 149 कांस्य पदकांसह एकूण 503 पदके जिंकली आहेत. गेल्या 3 राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं 503 पैकी 231 पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. गेल्या वेळी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य अशी एकूण 66 पदके जिंकली होती. या कॉमनवेल्थमध्ये 215 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. इथे जाणून घ्या भारतीय खेळाडू मैदानात कधी उतरतील. किती वाजता सामने खेळले जातील. स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक (Commonwealth Games 2022 Schedule) जाणून घ्या
खेळा | तारीख | वेळ | स्टार खेळाडू |
---|---|---|---|
बॅडमिंटन | 29 जुलै ते 8 ऑगस्ट | 5 वाजल्यापासून | पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत |
बॉक्सिंग | 29 जुलै ते 7 ऑगस्ट | रात्री 9 पासून | निखत जरीन, लवलीना बोरेगोहन |
वजन उचल | 30 जुलै ते 3 ऑगस्ट | सकाळचे 5.00 | मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा |
कुस्ती | 5 आणि 6 ऑगस्ट | संध्याकाळी 7.30 पासून | बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक |
ऍथलेटिक्स | 30 जुलै ते 7 ऑगस्ट | सकाळी 10 पासून | एम श्रीशंकर, हिमा दास, दुती चंद |
क्रिकेट | 29 जुलै ते 7 ऑगस्ट | सकाळी 11 वा | स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर |
हॉकी | 29 जुलै ते 8 ऑगस्ट | संध्याकाळी 7.30 वा | |
सायकलिंग | 29 जुलै पासून | रात्री 10 पासून | रोनाल्डो, मयुरी लुटे |
ज्युडो | 1 ते 3 ऑगस्ट | दुपारी 2.30 वा | सुशीला |
स्क्वॅश | 29 जुलै ते 8 ऑगस्ट | दुपारी 4.30 वा | दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा |
टेबल टेनिस | 29 जुलै ते 8 ऑगस्ट | दुपारी 2 पासून | शरथ कमल, जी साथियान, मनिका बत्रा |
भारत 3×3 बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, नेट बॉल आणि रग्बी इव्हेंटमध्ये आव्हान देणार नाही. भारताने राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीत अनेक पदके जिंकली आहेत, पण यावेळी नेमबाजी हा या खेळांचा भाग नाही. त्यामुळे भारताच्या पदकतालिकेवरही परिणाम होईल.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्घाटन समारंभासाठी सिंधूला भारतीय संघाचा ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. यापूर्वी ही जबाबदारी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्याकडे देण्यात येणार होती. मात्र त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुखापत झाली, त्यानंतर तो राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला होता. चोप्राने आपल्या सोशल मीडिया हँडलवर म्हटले आहे की बर्मिंगहॅममध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही याची मला खंत आहे. विशेषत: उद्घाटन समारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक होण्याची संधी न मिळाल्याने मी निराश झालो आहे.
सिंधूने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपन या दोन सुपर 300 विजेतेपद पटकावले आहेत. तिला अव्वल खेळाडूंविरुद्ध चांगली कामगिरी करता येत नाही ही तिच्यासाठी चिंतेची बाब आहे. तिला अलीकडेच थायलंडच्या रत्चानोक इंथानॉन, चीनच्या चेन यू फेई आणि कोरियाच्या अन से विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. जर सातव्या मानांकित सिंधूने सुरुवातीच्या दोन फेऱ्या जिंकण्यात यश मिळवले तर तिला तिसऱ्या मानांकित अॅन से यंगचा सामना करावा लागेल, त्यांचा भारताविरुद्ध 5-0 असा शानदार रेकॉर्ड आहे.