नवी दिल्ली : राष्ट्रकुल खेळ (CWG 2022) सुरू होण्यापूर्वीच भारताला (India) मोठा धक्का बसला होता. रिपोर्ट्सनुसार, भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूमध्ये (PV Sindhu) कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. रिपोर्ट्सनुसार तिला बॅडमिंटन संघापासून वेगळ करण्यात आलं होतं. नीरज चोप्राच्या दुखापतीनंतर पीव्ही सिंधू आणि मनप्रीत सिंग यांना भारतीय संघाचे ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. प्रत्येक देशासाठी दोन ध्वजधारक असणे आवश्यक असल्याची माहिती आयोजकांनी दिल्याने दुसरा ध्वजवाहक म्हणून मनप्रीतचं नाव जोडलं गेलं आहे. दरम्यान, पीव्ही सिंधूची दुसरी चाचणी निगेटिव्हा आल्याने तिला कोरोना नसल्याची माहिती आहे. यामुळे तिला गेम्स व्हिलेजमध्ये देखील प्रवेश मिळाला आहे. ही भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. यामुळे भारताची मोठी चिंता मिटली आहे. आजपासून राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाली असून खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
भारत 3×3 बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, नेट बॉल आणि रग्बी इव्हेंटमध्ये आव्हान देणार नाही. भारताने राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीत अनेक पदके जिंकली आहेत, पण यावेळी नेमबाजी हा या खेळांचा भाग नाही. त्यामुळे भारताच्या पदकतालिकेवरही परिणाम होईल.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्घाटन समारंभासाठी सिंधूला भारतीय संघाचा ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. यापूर्वी ही जबाबदारी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्याकडे देण्यात येणार होती. मात्र त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुखापत झाली, त्यानंतर तो राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला होता. चोप्राने आपल्या सोशल मीडिया हँडलवर म्हटले आहे की बर्मिंगहॅममध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही याची मला खंत आहे. विशेषत: उद्घाटन समारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक होण्याची संधी न मिळाल्याने मी निराश झालो आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 181 सुवर्ण, 173 रौप्य, 149 कांस्य पदकांसह एकूण 503 पदके जिंकली आहेत. गेल्या 3 राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं 503 पैकी 231 पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. गेल्या वेळी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य अशी एकूण 66 पदके जिंकली होती. या कॉमनवेल्थमध्ये 215 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत.