Harmanpreet Kaur: रोहित-विराट काय एमएस धोनीही मागे पडला, हरमनप्रीत कौरनं पाकिस्तानविरुद्ध हा विक्रम केला, जाणून घ्या…
राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह हरमनप्रीत कौरने अनुभवी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकत मोठा विक्रम केला आहे.
नवी दिल्ली : हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारताने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) पाकिस्तानचा (IND vs PAK) 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनानं तुफानी खेळी केली. पाकिस्तानविरुद्धच्या विजयाने भारतासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे अजूनही खुले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानी संघाविरुद्ध मोठा विजय नोंदवताना हरमनप्रीत कौरने महान महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मागे टाकले. पाकिस्तानविरुद्धचा विजय हा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील T20 क्रिकेटमधील एकूण 42 वा विजय होता. आता हरमनप्रीत भारताची सर्वात यशस्वी कर्णधार बनली आहे. त्याच वेळी, महान महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 71 सामने खेळले, ज्यामध्ये टीम इंडियाला 41 विजय मिळाले. भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 30 सामने आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 27 टी-20 सामने जिंकले आहेत. 33 वर्षीय हरमनप्रीत कौरने कर्णधार म्हणून या दिग्गज खेळाडूंना मागे सोडले आहे.
पाकिस्तानविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय
- हरमनप्रीत कौर – 42
- एमएस धोनी – 41
- विराट कोहली – 30
- रोहित शर्मा – 27
भारताने पाकिस्तानला हरवले
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानी संघ भारताविरुद्ध टिकू शकला नाही. पाकिस्तानने भारताला जिंकण्यासाठी 99 धावांचं लक्ष्य दिलं होतं जे टीम इंडियानं 2 गडी गमावून सहज गाठले. भारतासाठी गोलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. राधा यादव आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी शेफाली वर्मा, मेघना सिंग आणि रेणुका सिंगने 1-1 विकेट घेतली.
मंधानाने शानदार खेळी केली
टीम इंडियाकडून या सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनाने सर्वाधिक धावा केल्या. या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना तिला अर्धशतक झळकावण्यात यश आले. स्मृती मंधानाने 42 चेंडूत 63 धावांची खेळी खेळली, ज्यात तिने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. मंधानामुळेच टीम इंडियाला विजय मिळवता आला.
पाकिस्तानी फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिलं नाही
पाकिस्तानची कॅप्टन बिस्माह मारुफने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावू दिले नाही. पावसामुळे हा सामना 20 ऐवजी 18 षटकांचा करण्यात आला होता. पाकिस्तानची टीम निर्धारित 18 ओव्हर्स मध्ये 99 धावांवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानकडून फक्त सलामीवीर मुनीबा अलीने 30 चेंडूत सर्वाधिक 32 धावा केल्या. कॅप्टन बिस्माह मारुफने (17) धावा केल्या. पाकिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. इरम जावेदच्या रुपाने शुन्यावर पाकिस्तानची पहिली विकेट गेली. त्यानंतर मुनीबा आणि मारुफने डाव सावरला. दोघींनी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर भारताची गोलंदाज स्नेह राणाने मारुफने 17 धावांवर पायचीत पकडलं. त्यानंतर पाकिस्तानच्या डावाची घसरण सुरु झाली. पाकिस्तानचा डाव 99 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणा, राधा यादवन प्रत्येकी दोन, तर रेणुका सिंह, मेघना सिंह आणि शेफाली वर्माने प्रत्येकी एक विकेट घेतला.