लंडन: विश्वचषकात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये सामना रंगलेला असतानाच दुसऱ्या एका सामन्यानेही क्रिकेटरसिकांची मनं जिंकली आहे. हा सामना होता न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचा. भारत आणि अफगाणिस्तानप्रमाणेच न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमधील सामना अखेरच्या षटकांपर्यंत चालला. या वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रथेवेटच्या झुंजार खेळीने सर्वच क्रिकेटरसिकांची मनं जिंकली. मात्र ब्रथेवेटची ही एकाकी झुंज वेस्ट इंडिजला विजय मिळवून देण्यात थोडक्यात चुकली. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजच्या संघावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर सर्वत्र चर्चा मात्र वेस्ट इंडिजची आहे. त्यांनी दिग्गज न्यूझीलंडला दिलेले आव्हान आणि केलेल्या खेळीने क्रिकेटरसिकांची मनं जिंकली आहे.
विश्वचषकातील पहिल्या 3 दिग्गज संघांपैकी एक न्यूझीलंडला वेस्ट इंडिजने अनपेक्षितपणे अगदी जेरीस आणलं. इंडिजचा गोलंदाज कोटरेलने दमदार 4 विकेट घेतल्या. त्याच्या विकेट घेतल्यानंतरची सॅल्यूट करत आनंद साजऱ्या करण्याच्या पद्धतही चांगलीच गाजली. न्यूझीलंड हा सामना एकतर्फी जिंकेल असा अंदाज लावला जात होता. मात्र, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवत सर्वच अंदाज फोल ठरवले. न्यूझीलंडची अक्षरशः तारांबळ उडवल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यानंतरही न्यूझीलंडच्या संघाने चिवटपणे खेळी करत वेस्ट इंडिजसमोर 291 धावांचे लक्ष्य ठेवले.
विलीयमसनची धडाकेबाज खेळी
न्यूझीलंडकडून माँक केन विलीयमसनने “जिथं कमी तिथं आम्ही” या उक्तीप्रमाणे धडाकेबाज खेळी करत शतक ठोकलं. त्याच्या 148 धावांच्या खेळीच्या जोरावरच न्यूझींलडला 291 चा टप्पा गाठता आला. या लक्ष्याचा पाठलाग करायला उतलेल्या इंडिजलाही न्यूझीलंडने सुरुवातीपासून जेरीस आणलं. वेस्ट इंडिजच्या केवळ 20 धावांवर 2 विकेट पडल्या. मात्र, त्यानंतर हेटमेअर आणि ख्रिस गेलने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने सामन्यात पुनरागमन करत 22 षटकांमध्ये 142 धावांचा पल्ला गाठला.
कार्लोस ब्रथेवेटची एकाकी झुंज
आता वेस्ट इंडिज ऐटीत जिंकणार अस वाटत असतानाच न्यूझीलंडच्या गालंदाजांनी पुढील 22 धावांमध्ये तब्बल 5 विकेट घेतल्या. इंडिजची अवस्था 7 बाद 164 धावा अशी झाली. यानंतर पुन्हा वेस्ट इंडिजला विजय दिसेनासा झाला आणि न्यूझीलंडचा सामन्यातील विजय निश्चित मानला जाऊ लागला. यानंतर अनेकांना सामना एकतर्फी होईल, असेच वाटले. मात्र, 2016 च्या 20-20 विश्वचषकात अंतिम सामन्यात 4 षटकार लगावून सामना फिरवणाऱ्या कार्लोस ब्रथेवेटने पुन्हा त्याच खेळीची आठवण करुन दिली. त्यावेळी “Remember The Name… Carlos Brathwaite” हे वाक्य चांगलंच गाजलं होतं. कार्लोस ब्रथेवेटनं तळातील खेळाडूंना सोबत घेऊन धावांचा रतिब सुरु ठेवला. ब्रथेवेटने हा सामना अखेर 3 षटकांमध्ये 33 धावांपर्यंत आणून ठेवला. 48 व्या षटकात तर ब्रथवेटच्या स्फोटक खेळीने न्यूझीलंडच्या तोंडचे पाणी पळवले आणि त्यांना पराभवाचे दर्शन करुन आणले. या षटकात त्याने चक्क 25 धावा ठोकत सामन्याची स्थिती 12 चेंडूत 8 धावांवर आणली.
सामना न्यूझीलंडच्या खिशात
या सामन्याच्या 49 व्या षटकात पुन्हा क्रिकेट खेळाच्या स्वभावानुसार सर्वच अंदाज फोल ठरत सामना फिरला. या षटकात पहिले तिन्ही चेंडू निर्धाव गेले. चौथ्या चेंडूवर 2 धावा करत ब्रथेवेटने 81 चेंडूत शतक पूर्ण केले. आता 7 चेंडूत फक्त 6 धावा हव्या असताना ब्रथेवेटने एक जोरदार फटका लगावला. तो आकाशात गेला मात्र सीमारेषा ओलांडण्याच्या आधीच बोल्टने सुरेख झेल घेत ब्रथेवेटचे इरादे धुळीस मिळवले आणि न्यूझीलंडने सामना खिशात घातला. विंडीजचे फलंदाज झटपट विकेट सोडत असताना ब्रथेवेटने एकाकी झुंज दिली मात्र, ती अपुरी पडल्याने अखेर ब्रथेवेट आपल्या गुडघ्यावर हतबल होऊन बसलेला दिसला.