धोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’
विश्वचषक 2019 चा अंतिम सामना आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमांचक अंतिम सामन्यांपैकी एक ठरला. ह्रदयाचे ठोके बंद करणाऱ्या या सामन्यात नशीबने इंग्लंडची साथ दिल्याने न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंड विश्वविजेता ठरला.
मुंबई: विश्वचषक 2019 चा अंतिम सामना आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमांचक अंतिम सामन्यांपैकी एक ठरला. ह्रदयाचे ठोके बंद करणाऱ्या या सामन्यात नशीबने इंग्लंडची साथ दिल्याने न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंड विश्वविजेता ठरला. मात्र, असा कोणता क्षण होता ज्यावेळी न्यूझीलंडच्या संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तुटले. सुपर ओव्हरमध्ये 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतलेल्या न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूत 2 धावा हव्या होत्या. यावेळी मार्टिन गप्टिल स्ट्राईकवर होता आणि त्याला एकच धाव घेता आली. दुसरी धाव घेताना तो रन आऊट झाला आणि न्यूझीलंडचा पराभव झाला.
A World Cup title decided by the finest of margins.#CWC19Final pic.twitter.com/iJUO7ElW8L
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019
मार्टिन गप्टिल रन आऊट झाल्यानंतर ज्याप्रकारे न्यूझीलंडचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तुटले, तसेच काहिसे भारतासोबतही झाले होते. पहिल्या सेमीफायनल सामन्याते न्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी रन आऊट झाला होता. त्याचवेळी भारताचे फायनलमध्ये जाण्यास स्वप्न भंगले होते. यातील विशेष गोष्ट म्हणजे धोनीला रन आऊट करणारा त्यावेळचा खेळाडू मार्टिन गप्टिलच होता. आता स्वतः अंतिम सामन्यात ‘रन आऊट’ झाल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी गप्टिलला ‘करणी तशी भरणी’ म्हणत धोनीच्या रन आऊटची आठवण करुन दिली आहे.
शेवटच्या चेंडूवर काय झाले?
जिमी नीशामने सुपर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. मात्र, शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना मार्टिन गप्टिल स्ट्राईकवर आला. मात्र, गप्टिलची संपूर्ण विश्वचषकातील फलंदाजी समाधानकारक राहिलेली नाही. तरिही या अखेरच्या चेंडूवर त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा केल्या जात होत्या. त्याने मिड ऑनच्या दिशेने फटका लगावला आणि दोन धावांसाठी धावला. मात्र, तो एकच धाव घेऊ शकला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नातच बाद झाला.
भारतीय फॅन्सने महेंद्रसिंग धोनीची आठवण करुन दिली!
यावेळच्या विश्वचषकात भारतीय संघ सेमीफायनलमधून बाहेर झाल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेट रसिकांना मनोमन न्यूझीलंड जिंकावा, असे वाटत होते. टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसलेल्या प्रत्येक भारतीय चाहत्याची ही अपेक्षा मार्टिन गप्टिल ‘रन आऊट’ झाल्यावर अपूर्ण राहिली. भारतीय फॅन्सने ट्विट केले, जेव्हा गप्टिलने धोनीला रन आऊट केले तेव्हा भारतीय फन्सचं मन तुटलं होतं. आता त्यांच्यासोबतही तसेच झाले. काही चाहत्यांनी न्यूझीलंडला त्यांच्या कर्माचे फळ मिळाल्याचाही उपरोधिक टोला लगावला. रात्रभर ट्विटरवर #Karma हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.
‘त्या’ ठिकाणी पण गप्टिल होता
इंग्लंड फलंदाजी करत असताना 50 व्या षटकात बेन स्टोक्सने एक चेंडू खेळला. हा चेंडू ‘मिड ऑफ’च्या दिशेला केला आणि मार्टिन गप्टिलने क्षेत्ररक्षण करत ‘थ्रो’ केला. तो थ्रो थेट स्टोक्सच्या बॅटवर जाऊन आदळला आणि सीमारेषेपार झाला. त्यामुळे या चेंडूवर इंग्लडला एकूण 6 धावा मिळाल्या. त्यामुळे इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले आणि सामना बरोबरीत राहिला.