टी20 वर्ल्डकप संघात मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला मिळालं स्थान, दिल्लीच्या दोघांचं नशिब चमकलं
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेने आपल्या संघांची घोषणा केली आहे. तर संघ घोषणेची शेवटची तारीख ही 1 मे आहे. असं असताना टीम इंडिया कधी जाहीर होईल याबाबतही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख ही 1 मे आहे. न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केल्यानंतर दक्षिण अफ्रिकेनेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघातील बहुतांश खेळाडू हे सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. इतकंच त्यांची कामगिरी पाहता हा एक तगडा संघ दिसत आहे. कर्णधार एडन मार्करम, हेन्रिक क्लासेन आणि मार्को जानसेन (सनरायझर्स हैदराबाद), एनरिक नॉर्किया आणि ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली कॅपिटल्स), गेराल्ड कोएत्झी (मुंबई इंडियन्स), क्विंटन डीकॉक (लखनौ सुपर जायंट्स), डेविड मिलर (गुजरात टायटन्स), कगिसो रबाडा (पंजाब किंग्स), केशव महाराज (राजस्थान रॉयल्स) या संघांकडून खेळत आहेत. दक्षिण आफ्रिका संघात वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमॅन आणि विकेटकीपर फलंदाज रयान रिकेल्टन यांचंही नाव आहे. रिकेल्टनने एसए20 स्पर्धेत एमआय केपटाउनसाठी 58.88 च्या सरासरीने 173.77 च्या स्ट्राईक रेटने 530 धावा केल्या होत्या. तर बार्टमॅनने सनरायझर्स ईस्टर्न केपसाठी 8 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या होत्या.
दक्षिण अफ्रिकेचा संघ ग्रुप डीमध्ये असून सोबतीला श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ संघ आहे. दक्षिण अफ्रिकेचा ग्रुप डीमध्ये पहिला सामना 3 जूनला श्रीलंकेसोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यानंतर नेदरलँडसोबत 8 जूनला, बांगलादेशसोबत 10 जूनला सामना असून न्यूयॉर्कमध्ये असणार आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना दक्षिण अफ्रिका नेपाळसोबत खेळणार असून हा सामना 14 जूनला सेंट विनसेंट येथील मैदानात असणार आहे.
“अलीकडेच खेळले गेलेले टी20 क्रिकेट आणि त्यातील खेळाडूंचा फॉर्म लक्षात घेता या संघाची निवड करणे अत्यंत कठीण होते. मी रायन आणि ओटनील या दोन अनकॅप्ड खेळाडूंचे त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करू इच्छितो. आम्ही शक्य तितक्या मजबूत संघाची निवड केली आहे. या संघात वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये यशाची धी आहे यात शंका नाही.” असे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेचा टी20 वर्ल्डकपसाठी: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, आर. , तबरेझ शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स. राखीव खेळाडू : (नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी).
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी तात्पुरत्या संघाचीघोषणा केली आहे. ही टी20 मालिका विश्वचषकापूर्वी होणार आहे. पण सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या उपलब्धतेनुसार या संघात बदल होऊ शकतात. “स्पर्धेसाठी आमची तयारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने सुरू होईल. पण दुर्दैवाने सध्या आयपीएलमध्ये बरेच खेळाडू सहभागी आहेत. त्यामुळे बहुतेक संघ खेळाडूंशिवाय असेल. पण त्यामुळे इतरांना संधी मिळते.”, असं मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी सांगितले.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ : ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, न्काबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी आणि डुसेन रासेन.