Asia Cup 2025: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने पाडला षटकारांचा पाऊस, झंझावाती अर्धशतक
आयपीएल 2025 मेगा लिलावात सर्वांचं लक्ष वेधून घेणारा वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंडर 19 आशिया कप स्पर्धेत त्याने आपल्या फटकेबाजीने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. राजस्थान रॉयल्सने 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर उगाच कोट्यवधींची बोली लावली नाही, असंच म्हणावं लागेल. कारण त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीचं पुन्हा एकदा दर्शन घडवलं आहे.
अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत आणि युएई हे दोन संघ आमनेसामने आले होते. युएईने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 44 षटकांचा सामना करत 10 गडी गमवून 137 धावा केल्या आणि विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 16.1 षटकात एकही गडी न गमवता पूर्ण केलं. भारताकडून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या जोडीने युएईच्या गोलंदाजींची पिसं काढली. आयुष म्हात्रेने 51 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने नाबाद 67 आणि वैभव सूर्यवंशीने 46 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने नाबाद 76 धावा केल्या. या दोघांनी विजयी भागीदारी केली. वैभव सूर्यवंशी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपला हेतू स्पष्ट केला.वैभवला दुसऱ्या षटकाच्या पहिल्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली. तेव्हा अली असगर गोलंदाजी करत होता. पहिल्याच चेंडूचा सामना करता स्लॉग स्वीप शॉट मारत षटकार मारला. षटकार इतका लांब मारला की समालोचकही आश्चर्यचकीत झाला. कारण 13 व्या वर्षीत 80 ते 90 मीटर लांब षटकार मारणं वाटतं तितकं सोपं नाही.
युएईच्या गोलंदाजांनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण पुढच्या 10 चेंडूवर 4 षटकार मारत गोलंदाजांची हवा काढली. वैभव सूर्यवंशी फक्त 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण कलं. अंडर 19 आशिया कप स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचं हे पहिलं अर्धशतक आहे. वैभव सूर्यवंशीसाठी ही खेळी खूपच आवश्यक होती. कारण मागच्या दोन सामन्यात त्याला काही खास करता आलं नव्हतं. पाकिस्तानविरुद्ध 1 रन, तर जापानविरुद्ध 23 धावा करू शकला होता. पण युएईविरुद्ध फलंदाजीत त्यांनी सर्व कसर भरून काढली.
आयपीएल 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. या संघांचं प्रशिक्षक राहुल द्रविड असून त्याच्या मुशीत वैभवला पैलू पडतील यात शंका नाही. राजस्थान रॉयल्सने त्याचा खेळ पाहूनच कोट्यवधी रुपयांची बोली लावली आहे. त्याची बेस प्राईस 30 लाख होती. पण राजस्थानने त्याच्यासाठी 1.1 कोटींची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात घेतलं.