17 वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे घेणार ऋतुराज गायकवाडची जागा, अशी आहे कामगिरी

आयपीएल 2025 स्पर्धेत आयुष म्हात्रेला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्याने संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्याची जागा आता आयुष म्हात्रेने घतेली आहे.

17 वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे घेणार ऋतुराज गायकवाडची जागा, अशी आहे कामगिरी
आयुष म्हात्रे
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 14, 2025 | 11:38 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची स्थिती नाजूक आहे. प्लेऑफचं गणित आता खूपच किचकट झालं आहे. खरं तर एखादा चमत्कार घडला तरच काही तरी होऊ शकतं. असं असताना कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाली आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे त्याची जागा कोण घेणार याची उत्सुकता होती? अखेर ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट मिळाली आहे. 17 वर्षीय आयुष म्हात्रेला त्याच्या जागी संघात घेतलं आहे. आयुषने या पर्वाच्या मध्यात चेन्नई सुपर किंग्ससाठी चाचणी दिली होती. त्यातून त्याची निवड करण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्याला 30 लाखांच्या बेस प्राईससह संघात घेतलं आहे. आयुष म्हात्रे हा आयपीएल स्पर्धेतील दुसरा युवा खेळाडू आहे. पहिल्या स्थानावर वैभव सूर्यवंशी असून त्याचं वय 14 वर्षे आणि 18 दिवस आहे.

कोण आहे आयुष म्हात्रे?

आयुष म्हात्रे हा मुंबईचा क्रिकेटपटू आहे. 17 वर्षांचा असून सलामीवीर आणि ऑफ स्पिन करतो. म्हणजेच अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावतो. आयुषने प्रथम श्रेणी क्रिकेट 9 सामने खेळले आहेत. मात्र या 9 सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याने 31 च्या सरासरीने 504 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 176 आहे. आयुषने लिस्ट ए 7 सामन्यात 65 च्या सरासरीने 458 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याला खऱ्या अर्थाने ओळख ही विजय हजारे ट्रॉफीत मिळाली. या स्पर्धेत त्याने 117 चेंडूत 181 धावांची आक्रमक खेळी केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या सूत्रांनी क्रिकबजला दिलेल्या माहितीनुसार, ‘तो येत्या काही दिवसात मुंबईत संघासोबत असेल.’ चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये 20 एप्रिलला सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने घेतलेल्या ट्रायलमध्ये गुजरातच्या उर्विल पटेल आणि उत्तर प्रदेशच्या सलमान निजारला बोलवलं होतं. तर मुंबईतून आयुष म्हात्रेही ट्रायलसाठी आला होता. आयपीएलमध्ये अनसोल्ड असलेला पृथ्वी शॉही या शर्यतीत होता. मात्र ऋतुराजच्या जागी आयुषला निवडलं.