ODI Cricket : वनडे वर्ल्डकपनंतर 50 षटकांचे सामने होणार बंद? एमसीसीचा मास्टर प्लान
क्रिकेटमधील टी 20 फॉर्मेटनंतर वनडे सामन्यांचं महत्त्व तसं कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वनडे क्रिकेटसाठी एक प्रस्ताव सूचवला होता. पण आता एमसीसी वेगळाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात सध्या तीन फॉर्मेट आहेत. यात कसोटी, एकदिवसीय 50 षटकांचे सामने आणि झटपट टी 20 फॉर्मेटचा समावेश आहे. सध्या टी 20 क्रिकेटचा सर्वाधिक बोलबाला असून वनडे क्रिकेट क्रिकेट कंटाळवाणं झाल्याची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा आहे. क्रीडारसिकांचा कल पाहता क्रिकेट खेळाची नियमावली तयार करणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) आता नवा प्रस्ताव तयार केला आहे. एमसीसीने 2027 च्या वर्ल्डकपनंतर वनडे सामने कमी करण्याचा सल्ला आयसीसीला दिला आहे. लॉर्ड्समध्ये झालेल्या बैठकीत असा प्रस्ताव देण्यात आला आहे. 13 सदस्यीय समितीने वर्ल्डकप आयोजनाच्या एक वर्षाआधी द्विपक्षीय वनडे सीरिज घेऊ नका, असंही प्रस्तावात नमूद केलं आहे.
वनडे फॉर्मेट संपुष्टात येणार?
मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेतील डरबनमध्ये वनडे क्रिकेटबाबत एक बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. पीटीआयनुसार, आयसीसीच्या एका सदस्याने सांगितलं आहे की वर्ल्डकप 2023 आणि चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धा जवळ आहे. मात्र असं असूनही लोकांचा हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कोरोनानंतर लोकांचा टी20 फॉर्मेटकडे कल वाढला आहे.
दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतातच लोकं मैदानात येऊन सामने पाहू शकतात अशी स्थिती आहे. वनडे फॉर्मेट टिकवण्यासाठी जनसमुदायाची गरज आहे. आयसीसीच्या मते, ब्रॉडकास्टर्सही टेस्ट सीरिज किंवा टी 20 फॉर्मेटवर लक्ष्य केंद्रीत करत आहेत. त्यामुळे वनडे क्रिकेटच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कसोटीबाबत एमसीसीचं काय म्हणणं आहे
एमसीसीच्या म्हणण्यानुसार, कसोटी फॉर्मेटसमोर मोठं आव्हान आहे. कसोटी फॉर्मेट अस्तित्वाची लढाई लढत आहे. काही देश पाच दिवस सामन्यावर पैसे खर्च करू इच्छित नाहीत. यासाठी त्यांनी झिम्बाब्वेचं उदाहरण दिलं. झिम्बाब्वेनं 2017 असा निर्णय घेतला होता की, जास्तीत जास्त सामने देशाबाहेर खेळायचे. ही स्थिती पाहता एमसीसीने आयसीसीला सल्ला दिला आहे की, कसोटी सामन्यासाठी वेगळा फंड तयार करावा.
इंग्लंडचे माजी कर्णधार माइक गॅटिंग यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यीय समितीत सौरव गांगुली आणि झूलन गोस्वामी यांचा समावेश आहे. या सर्वांनी आयसीसीला 2027 नंतर मेन्स क्रिकेटसाठी एक संतुलित टूर प्रोग्राम आखण्यास सांगितलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिलेला असा प्रस्ताव
कसोटीप्रमाणे वनडे क्रिकेटमध्येही दोन डाव खेळवण्याचा सल्ला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला होता. म्हणजेच 25-25 षटकांचे चार डाव होतील. प्रत्येक संघाच्या हाती दोन डावात मिळून 10 विकेटच असतील. 25 षटकानंतर दुसऱ्या संघाला 25 षटकं खेळण्याची संधी मिळेल. या फॉर्मेटमुळे दोन्ही संघांना पिच, टॉस आणि इतर बाबींची बरोबर मदत होईल आणि उत्सुकता देखील वाढेल.