IND vs NZ : उपांत्य फेरीपूर्वी रोहित शर्माचा खुलासा, सिक्रेट फॅशन शोबाबत उघड केलं गुपित
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात सेमी फायनल होणार आहे. या सामन्यात अंतिम फेरीसाठीचा संघ ठरणार आहे. 2019 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने पराभूत केलं होतं. त्या निमित्ताने पुन्हा एकदा जखमा ओल्या झाल्या आहेत.
मुंबई : टीम इंडियासाठी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी फक्त दोन सामने राहिले आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत केलं तर अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी सामना होईल. वर्ल्डकप स्पर्धा आता संपायला आली असताना टीम इंडियातील एक एक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. उपांत्य फेरीपूर्वी रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याने पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिली. तसेच स्पर्धेदरम्यान टीम इंडियातील एक गुपित उघड केलं आहे. पत्रकारांना सिक्रेट फॅशन शोबाबत सांगितलं आहे. साखळी फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडला चार गडी राखून पराभूत केलं. या विजयानंतर एका फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं.
‘आम्ही धर्मशाळेत एक सिक्रेट फॅशन शो देखील केला होता ज्याबद्दल कोणालाही माहिती नाही. आता त्यात कोण जिंकलं हे मी सांगणार नाही. पण संघातील वातावरण चांगलं आहे. प्रत्येक जण रिलॅक्स आहे.,’ असं रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत सांगितले. रोहित शर्माने न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्याबाबतही आपलं मत मांडलं.
‘भुतकाळातल्या काही गोष्टी तुमच्या डोक्यात फिरत असतात. कारण त्यात काय घडलं याची जाणीव असते. पण मागचं पुन्हा उरकून काढण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही आमचा फोकस उद्या आणि परवा काय करायचं यावर ठेवला आहे. त्यामुळे दहा वर्षापूर्वी काय झालं, पाच वर्षापूर्वी काय झालं याची चर्चा आता करणं योग्य नाही.’, असं रोहित शर्मा म्हणाला.
‘माझ्याकडे काही मंत्र नाही. पण कर्णधार म्हणून काय निर्णय घ्यायचा हे स्पष्ट असणं गरजेचं आहे. खेळाडूंच्या पाठी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. ज्या खेळाडूंना रोल दिला आहे त्यांच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. याचं श्रेय मी राहुल द्रविडला देईल. भविष्यातही आम्ही तेच करत राहू. स्पष्ट भूमिका आणि खेळण्याचं स्वातंत्र्य या बाबी महत्त्वाच्या आहेत.’, असं रोहित शर्मा याने पुढे सांगितलं.