हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात केलेली चूक पराभवासाठी कारण ठरली! सोशल मीडियावर चर्चा
दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 3 गडी राखून पराभव केला. या पराभवाची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. यात हार्दिक पांड्याची खेळीही कारणीभूत धरली जात आहे. नेमकं असं काय घडलं की पराभवाचं गणित मांडताना हार्दिक पांड्याला दोषी धरलं जात आहे.
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण अफ्रिकेने 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता मालिका विजयासाठी पुढच्या दोन सामन्यात कोण वरचढ ठरतं? याची उत्सुकता लागून आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या पराभवाची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव याने या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. दुसरीकडे या पराभवाचं सोशल मीडियावरही विश्लेषण होत आहे. यात हार्दिक पांड्यालाही दोषी धरलं जात आहे. शेवटच्या षटकात केलेली चूक भोवल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. झालं असं की, दुसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव नशिब फुटकं निघालं आणि नाणेफेक गमावली. त्यामुळे प्रथम फलंदाजी वाटेला आली. यावेळी संजू सॅमसनकडून अपेक्षा होत्या. मात्र तो फेल गेला. त्यात इतर फलंदाजही काही खास करू शकले नाही. त्यामुळे टीम इंडिया कशीबशी 124 धावांवर पोहोचली. असं असलं तरी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र शेवटच्या षटकांमध्ये काही धावा कमी पडल्या. यासाठी हार्दिक पांड्याला जबाबदार धरलं जात आहे.
भारताच्या डावात शेवटच्या षटकात हार्दिक पांड्या स्ट्राईकला होता. भारताने 19 षटकात 6 बाद 118 धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्या स्ट्राईक असल्याने अपेक्षा होत्या. पहिलाच चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर फटका मारला पण कॅच सुटला. पण धाव घेतली नाही. तिसऱ्या चेंडू पुन्हा निर्धाव गेला. चौथ्या चेंडूवर पुन्हा एक जोरदार फटका मारला. पण हातातला झेल सुटला तरी धाव घेतली नाही. पाचव्या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. खरं तर या षटकात 20 धावा अपेक्षित होत्या. मात्र फक्त 6 धावा आल्या.
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेला 12 चेंडूत 13 धावांची गरज होती. अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता आणि समोर एकाकी झुंज देणारा ट्रिस्टन स्टब्स होता. स्टब्सने पहिल्या दोन चेंडूवर दोनचौकार मारले आणि दबाव कमी केला. त्यानंतर दोन चेंडू निर्धाव गेले. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे टीम इंडियाचा विजयाचा रथ रोखला गेला. आतापर्यंत भारताने सलग 11 सामने जिंकले होते. मात्र आता विजयात खंड पडला आहे.