AFG vs AUS: टीम इंडियाला कमीपणा दाखवण्याचा मिचेल मार्शचा प्रयत्न, अफगाणिस्तान विरुद्ध पराभवानंतरही मस्ती जिरली नाही
Afghanistan vs Australia: अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतरही ऑस्ट्रेलिया कॅप्टन मिचेल मार्श याची मस्ती वितभरही कमी झालेली नाही. टीम इंडियाबाबत काय म्हणाला? बघा.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत तुलनेने कमी मजबूत असलेल्या अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा माज काही कमी झालेला नाही. अफगाणिस्तान विरुद्ध पराभवानंतर सेमी फायनल स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर असलेल्या कांगारुंची मस्ती जिरलेली नाही. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचं सेमी फायनलचं समीकरण अवघड झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शला पराभवानंतर सेमी फायनलबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मार्शने टीम इंडियाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला.
ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तान विरुद्ध झालेला सामना हा सुपर 8 फेरीतील दुसरा सामना होता. कांगारुंनी पहिल्या सामन्यात बांगलादेशवर डीएलएसनुसार 28 धावांनी विजय मिळवला होता. तर आता अफगाणिस्तानकडून पराभूत व्हावं लागलं आहे. आता कांगारुंचा तिसरा आणि अखेरचा सुपर 8 मधील सामना टीम इंडिया विरुद्ध 24 जून रोजी होणार आहे. त्या सामन्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मार्शने अतिशहाणपणा दाखवला.
मार्श काय म्हणाला?
“आम्हाला आमच्या पुढील सामन्यात विजय मिळवायचाच आहे आणि त्यासाठी भारतारसारखी आणखी कोणतीच चांगली टीम नसू शकते, ज्यांच्या विरुद्ध आम्ही विजय मिळवू इच्छितो”, असं म्हणत मिचेल मार्शने टीम इंडियाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. मिचेलच्या या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांनी जोरादार टीका केली आहे.
दरम्यान अफगाणिस्तानची सलामी जोडी रहमानुल्लाह गुरबाज याने 60 आणि इब्राहीम झद्रान याने 51 धावांची खेळी केली. या दोघांनी 116 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतरही अफगाणिस्तानला 6 विकेट्स गमावून 148 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. गुलाबदीन नईब याने 20 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला 19.2 ओव्हरमध्ये 127 धावांवर ऑलआऊट करण्यात मोठी भूमिका बजावली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, ॲश्टन अगर, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.