Allah Ghazanfar समोर बांगलादेश ढेर, अफगाणिस्तानचा 92 धावांनी धमाकेदार विजय
Afg vs Ban 1st Odi Match Result : अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली आहे. अफगाणिस्तानने 92 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट टीमने बांगलादेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानने हशमतुल्ला शाहिदी याच्या नेतृत्वात बांगलादेशचा 92 धावांनी धुव्वा उडवला आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अफगाणिस्तानच्या बॉलिंगसमोर बांगलादेशने गुडघे टेकले. अल्लाह गझनफर याच्या बॉलिगंसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. तसेच इतर गोलंदाजांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे बांगलादेशचा डाव हा 34.4 ओव्हरमध्ये 143 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
बांगलादेश फुस्स
बांगलादेशने 12 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर आश्वासक सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानने ठराविक अंतराने झटके दिले. त्यानंतर अफगाणिस्तानने बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत गुंडाळलं. बांगलादेशकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. कॅप्टन नजमुल हुसैन शांतो याने सर्वाधिक 47 धावा केल्या. सौम्या सरकार याने 33 धावांचं योगदान दिलं. मेहदी हसन मिराज 28 रन्सवर आऊट झाला. तर तॉहीद हृदॉय याला 11 धावाच करता आल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर उभंही राहता आलं नाही. अल्लाह व्यतिरिक्त अफगाणिस्तानकडून राशिद खान याने 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह ओमरझई या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, रशीद खान, अल्लाह गझनफर, नांगेलिया खरोटे आणि फजलहक फारूकी.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनझिद हसन, सौम्या सरकार, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.