AFG vs SL | अफगाणिस्तानचं स्वप्न 2 धावांनी भंग, श्रीलंकेचा सनसनाटी विजय, सुपर 4 एन्ट्री
Asia Cup 2023 Afghanistan vs Sri Lanka | चित्तथरारक सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानवर 2 धावांनी विजय मिळवत सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. तर अफगाणिस्तानचं स्वप्न भंगलंय.
लाहोर | अफगाणिस्तान क्रिकेट टीमचं सुपर 4 मध्ये पोहचण्याचं स्वप्न अवघ्या 2 धावांनी भंगलं आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तानवर 2 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. यासह सुपर 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अफगाणिस्तानचं यासह दुर्देवाने आव्हान संपुष्टात आलं आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये 292 धावांचं आव्हान दिलं. अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी नेट रनरेटच्या हिशोबाने 37.1 ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण करायचं होतं. अफगाणिस्तानला ते आव्हान 37.1 ओव्हरमध्ये पूर्ण करता आलं नाही. अफगाणिस्तानला त्यानंतरही नेट रनरेटच्या हिशोबाने जिंकता आलं असतं. पण अफगाणिस्तान त्याआधीच 37.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली. यासह अफगाणिस्तानच्या स्वप्नाचा डोळ्यांसमोर चकनाचूर झाला आणि श्रीलंकेने गमावलेला सामना जिंकला.
अफगाणिनस्तानला निर्धारित ओव्हरमध्ये 292 धावांचं आव्हान पूर्ण करता आलं नाही. मात्र अफगाणिस्तानला 37.1 ओव्हरनंतरही सुधारित टार्गेटनुसार विजयासह सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी होती. त्यानुसार 37.2 ओव्हरमध्ये 293, 37.3 मध्ये 294, 37.5 मध्ये 295 आणि 38.1 ओव्हरमध्ये 297 धावा करुन सुपर 4 साठी क्वालिफाय करण्याची संधी होती. मात्र याबाबत ना मैदानात असलेल्या अफगाणि फलंदाजांना कल्पना होती ना ड्रेसिंग रुममधील इतर खेळाडूंना. त्यामुळे अफगाणिस्तान बाहेर पडली.
अफगाणिस्तानची बॅटिंग
अफगाणिस्तानची 292 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. अफगाणिस्ताने ठराविक अंतराने विकेट्स टाकल्याने 50-3 अशी स्थिती झाली. रहमानुल्लाह गुरुबाज 4, इब्राहीम झद्रान 7 आणि गुलाबदीन नईब 22 धावा करुन आऊट झाले. त्यानंतर रहमत शाह 45 धावा करुन आऊट झाला. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी आणि रहमत शाह या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली.
रहमतनंतर मोहम्मद नबी मैदानात आला. नबी आणि शाहिदी या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसं काढली. या दरम्यान नबीने अफगाणिस्तानसाठी वेगवान अर्धशतक ठोकलं. या जोडीने अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. मात्र महेश थेक्षाना याने ही जोडी फोडली. नबी 32 बॉलमधघ्ये 65 धावा करुन आऊट झाला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली.
नबीनंतर करीम जनत आला. जनतनेही मोठे फटके मारले. मात्र जनत फटकेबाजीच्या नादात 22 धावांवर आऊट झाला. त्याच ओव्हरमध्ये कॅप्टन हशमतुल्लाह 59 धावांवर आऊट झाला. दुनिथ वेललागे याने एका ओव्हमध्ये 2 विकेट घेतल्याने श्रीलंकेला कमबॅक करुन दिलं.
त्यानंतर नजीबुल्लाह झद्रान आणि राशिद खान या दोघांनी आपल्या खांद्यावर अफगाणिस्तानच्या विजयाची जबाबदारी घेतली. या दोघांनी ठोकाठोकी केली. मात्र झद्रान 23 धावांवर आऊट झाला. झद्रान आऊट झाल्याने अफगाणिस्तान बॅकफुटवर गेली. त्यात मुजीब उर रहमान झिरोवर आऊट झाला. त्यानंतर फझलहक फारुकी स्ट्राईकवर आला. तर सेट राशिद खान स्ट्राईक एंडवर होता. राशिदला स्ट्राईक हवी होती. मात्र धनंजय डी सील्वहा याने फझलहक फारुकी याला शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं आणि अफगाणिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम झाला.
6 सप्टेंबरपासून सुपर 4 राउंड
श्रीलंकेकडून कसून राजीथा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दुनिथ वेललागे आणि धनंजया डी सील्वा या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट गेल्या. तर मथीशा पथीराणा आणि महेश थेक्षणा या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. श्रीलंका या विजयासह सुपर 4 मध्ये पोहचणारी चौथी आणि अखेरची टीम ठरली. आता 6 सप्टेंबरपासून सुपर 4 फेरीला सुरुवात होणार आहे. सुपर 4 मधील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश असा होणार आहे.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.