Icc World Cup 2023 साठी अफगाणिस्तान टीम जाहीर, विराटच्या शत्रूची निवड
Afghanistan 2023 ODI World Cup Squad | अफगाणिस्तानची वर्ल्ड कप टीम ही आशिया कप 2023 टीमपेक्षा वेगळी आहे. या टीममध्ये वर्ल्ड कपसाठी कुणाला संधी मिळालीय आणि कुणाला नाही,जाणून घ्या.
काबूल | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चं आयोजन यंदा भारतात करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला एकूण 10 संघांनीही वर्ल्ड कपआधी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानने टीम जाहीर केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
15 मुख्य 3 राखीव
अफगाणिस्ताने वर्ल्ड कपसाठी 15 मुख्य खेळाडूंची निवड केली आहे. तर अफगाणिस्तानने एकूण 3 खेळाडूंना राखीव म्हणून संधी दिली आहे. अफगाणिस्तान वर्ल्ड कप टीम ही आशिया कप 2023 टीम पेक्षा पूर्ण वेगळी आहे. अफगाणिस्तानचं नुकतंच आशिया कपमधील आव्हान हे साखळी फेरीतच संपु्ष्टात आलं होतं. हशमतुल्लाह शाहिदी हा वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी अफगाणिस्तान क्रिकेट टीम
World Cup Bound AfghanAtalan Squad 🚨
Presenting before you the AfghanAtalan squad for the ICC Cricket World Cup 2023 in India. 🤩#AfghanAtalan | #CWC23 | #WarzaMaidanGata pic.twitter.com/r0SGg3KV8v
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 13, 2023
आशिया कप 2023 मधून अफगाणिस्तानच्या करीम जनात याने टीममध्ये 6 वर्षांनंतर कमबॅक केलं होतं. मात्र करीमला वनडे वर्ल्ड कपसाठी संधी देण्यात आलेली नाही. इतकंच नाही, तर ऑलराउंडर गुलबदीन नैब यालाही डच्चू देण्यात आला आहे. नैब याला संधी दिलीय, मात्र मुख्य संघात नाही. नैबचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
नवीन उल हक याचं कमबॅक
वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान टीममध्ये विराट कोहली याचा शत्रू नवीन उल हक याची एन्ट्री झाली आहे. नवीन उल हक हा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचं प्रतिनिधित्व करतो. त्याला भारतातील खेळपट्ट्यांचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे नवीन इतर संघांसाठी डोकेदुखी ठरु शकतो. नवीन व्यतिरिक्त गुजरात टीमचा स्पिनर नूर अहमद याची अफगाणिस्तान टीममध्ये निवड करण्यात आली आहे.
टीममध्ये 4 फिरकी गोलंदाज
दरम्यान अफगाणिस्तान टीममध्ये एकूण 4 फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद आहेत. तर नवीन उल हक आणि फजलहक फारुकी हे मुख्य वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्यासह अब्दुल रहमान आणि अब्दुल्लाह ओमरजई असतील. अफगाणिस्तानचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी धर्मशाळा इथे होणार आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम अफगाणिस्तान | हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), इब्राहिम झद्रान, रहमतुल्लाह गुरबाज, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, इकराम अली खिल, रियाज हसन, अब्दुल्लाह ओमरजई, राशिद खान, अब्दुल रहमान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी आणि नवीन उल हक.