Ban vs Afg 2nd Odi | अफगाणिस्तानचा बांगलादेशवर 142 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Bangladesh vs Afghanistan 2nd Odi | अफगाणिस्तानने बांगलादेशला त्यांच्याच घरात पराभूत केलं आहे. अफगाणिस्तानने दुसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली आहे.
चट्टोग्राम | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने मोठा कारनामा केला आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशवर मोठा विजय साकारला आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 142 धावांच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवला आहे. रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, मुजीब उर रहमान आणि फजलहक फारूकी हे चौघे अफगाणिस्तानच्या विजयाचे कलाकार ठरले. अफगाणिस्तानने बांगालदेशला विजयासाठी 332 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अफगाणिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा 43.2 ओव्हरमध्ये 189 धावांवर बाजार उठला. अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा विजय ठरला. अफगाणिस्तानने या विजयासह 2-0 अशा फरकाने 3 सामन्यांची मालिका जिंकली.
बांगलादेशवर घरात पराभूत होण्याची नामूष्की
Afghanistan secure a massive win and with it an unassailable 2-0 lead against Bangladesh in the ODI series ?#BANvAFG | https://t.co/mvFeGdwCsz pic.twitter.com/v4FRjgI3sF
— ICC (@ICC) July 8, 2023
बांगलादेशकडून 332 धावांचा पाठलाग करताना विकेटकीपर मुशफिकर रहीम याचा अपवाद वगळता एकालाही अफगाणिस्तान गोलंदाजांनी हात खोलू दिले नाहीत. रहीम याने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. कॅप्टन लिटॉन दास 13, तॉहिद हृदय 16, शाकिब अल हसन आणि मेहदी हसन या दोघांनी प्रत्येकी 25 धावा केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही.मुस्तफिजूर रहमान 7 धावांवर नाबाद राहिला. तर उर्विरत 4 जणांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. राशिद खान याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद नबी याने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
अफगाणिस्तानची बॅटिंग
तर त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अफगाणिस्तानकडून गुरुबाज याने 145 आणि इब्राहीम झद्रान याने 100 धावांची शतकी खेळी. या सलामी जोडीने 256 धावांची भागीदारी केली. या जोरावर अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये 9 बाद 331 अशी मजल मारली.
दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा मंगळवार 11 जूलै रोजी पार पडणार आहे. अफगाणिस्तानचा हा सामना जिंकून बांगलादेशचा सूपडा साफ करण्याची संधी आहे. तर बांगलादेशचा शेवटचा सामना जिंकून लाज राखण्याचा प्रयत्न असेल.
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, रशीद खान, फझलहक फारुकी, मुजीब उर रहमान, अजमातुल्ला उमरझाई आणि मोहम्मद सलीम साफी.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | लिटन दास (कर्णधार), मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, इबादोत हुसेन आणि मुस्तफिजुर रहमान.