Cricket : टी 20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची चॅम्पियन्स ट्रॉफीआधी निवृत्ती
Cricket Retirement : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 4 गोलंदाजांनी पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. त्यापैकी एका गोलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला आता मोजून काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत यजमान पाकिस्तानसह एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. मात्र त्याआधी अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिकेटरने घेतलेल्या एका निर्णयामुळे एकच चर्चा रंगली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीमच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. हा खेळाडू क्रिकेटपासून गेली 4 वर्ष दूर होता. त्यानंतर अखेर या खेळाडूने क्रिकेटपासून दूर होण्याचा निर्णय घेतला.
अफगाणिस्तानची यंदाची या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अफगाणिस्तान कसून सराव करत आहे. तर दुसऱ्या बाजूला शापूर जादरान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. शापूरने 2009 साली नेदरलँड्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तर अखेरचा सामना हा मार्च 2020 साली आयर्लंडविरुद्ध खेळला होता. शापूरचा हा सामना त्याच्यासाठी शेवटचा ठरला. शापूरच्या निवृत्तीची माहिती अफगाणिस्तानस क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
शापूरची उल्लेखनीय कामगिरी
शापूर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्याच बॉलवर विकेट घेणाऱ्या 4 गोलंदाजांपैकी एक आहे. शापूरने 2014 साली झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत हाँगकाँगविरुद्ध ही कामगिरी केली होती. शापूरने 18 मार्च 2014 रोजी हाँगकाँगच्या इरफान अहमद याला आऊट करत पहिल्या बॉलवर विकेट घेतली होती.
शापूरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शापूरने अफगाणिस्तानचं 44 एकदिवसीय आणि 36 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. शापूरने वनडेत 43 विकेट्स घेतल्या. तर टी 20i मध्ये 37 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
शापूर जादरान निवृत्त
Shapoor Zadran Calls Time on his International Career 🚨
Afghanistan’s big tall left-arm fast bowler Shapoor Zadran, a key figure in the rise of cricket in Afghanistan, announced his retirement from International cricket. He represented Afghanistan in 80 international matches… pic.twitter.com/46W3B4msHH
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 30, 2025
दरम्यान अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतील मोहिमेची सुरुवात ही 21 फेब्रुवारीपासून करणार आहे. अफगाणिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. तर 26 फेब्रुवारीला इंग्लंड आणि 28 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अफगानिस्तान टीम: हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), इब्राहिम जादरान, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान, एएम गजनफर, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद मलिक आणि नावेद जादरान .
राखीव खेळाडू : दरविश रसूली, नांग्याल खरोती आणि बिलाल सामी.