AFG vs BAN: अफगाणिस्तानची ऐतिहासिक कामगिरी, बांगलादेशला पराभूत करत सेमी फायनलमध्ये एन्ट्री, ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट
Afghanistan vs Bangladesh Match Result: बांगलादेशला विजयासाठी डीएलएसनुसार 114 धावांचं सुधारित आव्हान मिळालं होतं. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल करत ऐतिहासिक विजय मिळवला. अफगाणिस्तानची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने सुपर 8 फेरीतील शवेटच्या सामन्यात बांगलादेशला 8 धावांनी पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानच्या या विजयासह ऑस्ट्रेलियाचं पॅकअप झालं आहे. सातत्याने पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशला विजयासाठी डीएलएसनुसार 19 ओव्हरमध्ये 114 धावांचं सुधारित आव्हान मिळालं होतं. मात्र अफगाणिस्तनच्या गोलंदाजांनी या धावांचा शानदार बचाव करत बांगलादेशला 17.5 ओव्हरमध्ये 105 धावांवर ऑलआऊट केलं.
अफगाणिस्तानने बांगलादेशला सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. त्यामुळे बांगलादेशवर दबाव होता. मात्र ओपनर लिटॉस दासने एक बाजू लावून धरल्याने बांगलादेश अखेरपर्यंत सामन्यात राहिली. बांगलादेशला नेट रनरेटनुसार सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी 13 ओव्हरआधी जिंकायचं होतं. मात्र ते त्यांना जमलं नाही. त्यामुळे बांगलादेश बाहेर पडल्याचं निश्चित झालं होतं.
त्यानंतर समीकरणानुसार बांगलादेशला जिंकूनही फायदा झाला नसता, मात्र त्याचा फटका अफगाणिस्तानला बसला असता. बांगलादेशच्या विजयाने ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहचली असती आणि अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं असतं. मात्र कॅप्टन राशिद खानसह नवीन उल हक या जोडीने खरंच कमाल केली. दोघांनी 4-4 विकेट्स घेतल्या. लिटॉन दास अखेरपर्यंत 54 धावांवर नाबाद राहिला. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी इतर फलंदाजांना गुंडाळलं आणि पॅकअप केलं.
त्याआधी अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 115 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुरबाजने सर्वाधिक 43 धावा केल्या. इब्राहीम झद्रानने 18 आणि अझमतुल्लाहने 10 धावांचं योगदान दिलं. तर अखेरीस कॅप्टन राशिद खान याने 10 बॉलमध्ये 19 धावांची खेळी केली. तर करीम जनातने नाबाद 7 धावा केल्या. बांगलादेशकडून रिशाद हौसेन याने 3 विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर आणि तास्किन अहमद या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध भिडणार
दरम्यान आता सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणार आहे. तर ग्रुप 1 मधून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील सामना होणार आहे.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेयालिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, तौहिद ह्रदोय, शकिब अल हसन, महमुदुल्ला, सौम्या सरकार, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.