Afghanistan | 4 विजय-3 उलटफेर, लढले भिडले, अफगाणिस्तानचा वर्ल्ड कपमधील प्रवास
Afghanistan World Cup 2023 Journey | हशमतुल्लाह शाहीदी याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान क्रिकेट टीमेन आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये स्वप्नवत कामगिरी केली. जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास.
अहमदाबाद | दक्षिण आफ्रिकाने वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तान क्रिकेट टीमवर 5 विकेट्सने मात केली. दक्षिण आफ्रिकेचा हा स्पर्धेतील सातवा विजय ठरला. अफगाणिस्तानने शेवटपर्यंत झुंज दिली पण त्यांना शेवट गोड करण्यात अपयश आलं. अफगाणिस्तानचं या पराभवासह वर्ल्ड कपमधील आव्हान इथेच संपुष्टात आलं. अफगाणिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकायचा होता. मात्र ते शक्य झालं नाही. मात्र अफगाणिस्तानने क्रिकेट चाहत्यांची मनं मात्र नक्कीच जिंकली. अफगाणिस्तानचा या 13 वर्ल्ड कपमधील प्रवास कसा राहिला हे आपण जाणून घेऊयात.
अफगाणिस्तानचा प्रवास
अफगाणिस्तानने साखळी फेरीतील 9 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या 3 विश्व विजेत्या संघांना पाणी पाजलं. तसेच उलटफेर स्पेशालिस्ट नेदरलँड्सलाही चितपट केलं. अफगाणिस्तानने पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्स यांना पराभूत करत विजयाची हॅटट्रिकही पूर्ण केली. तर स्पर्धेतील अखेरचा विजय हा नेदरलँड्स विरुद्ध मिळवला.
वर्ल्ड कपमध्ये 8 वर्षांनी विजय
अफगाणिस्तानला या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश आणि टीम इंडियाकडून पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. अफगाणिस्तानला त्यानंतर तिसऱ्या सामन्यात विजयाची चव चाखता आली. अफगाणिस्तानने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडवर 69 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा इंग्लंड विरुद्ध हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला विजय ठरला. इतकंच नाही, तर अफगाणिस्तानचा हा 2015 नंतरच्या वर्ल्ड कपनंतर हा पहिलाच विजय ठरला. अफगाणिस्तानने अखेरचा वर्ल्ड कप विजय हा 2015 मध्ये स्कॉटलँड विरुद्ध मिळवला होता. तर 2019 वर्ल्ड कपमध्ये एकही सामन्यात विजयश्री मिळवता आली नाही.
अफगाणिस्तानला त्यानंतर न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानवर 8, श्रीलंका आणि नेदरलँड्सवर प्रत्येकी 7 विकेट्सने मात करत विजयी हॅटट्रिक साजरी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना अफगाणिस्तानने जिंकल्यात जमा होता. मात्र ग्लेन मॅक्सवेल याच्या ऐतिहासिक द्विशतकामुळे अफगाणिस्तानला जिंकलेला सामना गमवावा लागला. अफगाणिस्तानने हा सामना जिंकला असता तर कदाचित त्यांना सेमी फायनलमध्ये खेळण्याची शक्यता आणखी वाढली असती. मात्र तसं होऊ शकलं नाही.
तर शेवटच्या सामन्यात अफगाणि गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेसारख्या मातब्बर संघासमोर 245 धावांचा बचाव हा 47.2 ओव्हरपर्यंत केला. मात्र त्यापुढे काही यश आलं नाही आणि स्पर्धेतील पाचवा पराभव झाला. अफगाणिस्तानने अशा प्रकारे 4 सामने जिंकून 5 सामने गमावले.
अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.