टीम इंडियातून बाहेर केल्यानंतर मोहम्मद सिराजने अखेर मौन सोडलं, रोहित शर्माला दिलं असं उत्तर
आयपीएल 2025 स्पर्धेत मोहम्मद सिराज गुजरात टायटन्सकडून मैदानात उतरणार आहे. गुजरात टायटन्सचा पहिला सामना 25 मार्चला पंजाब किंग्स विरुद्ध असणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी मोहम्मद सिराजने मौन सोडलं आहे. टीम इंडियातून डावलल्यानंतर रोहित शर्माच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून मोहम्मद सिराजला संघातून डावललं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज म्हणून हार्षित राणा, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगवर विश्वास टाकला होता. रोहित शर्माने मोहम्मद सिराजला डावलण्याचं कारणंही स्पष्ट केलं होतं. जुन्या चेंडू गोलंदाजी करण्यात अयशस्वी असल्याचं कारण पुढे केलं होतं. आता सिराजने या प्रकरणार मौन सोडलं आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून मैदानात उतरण्यापूर्वी त्याने रोहित शर्माच्या तर्काला उत्तर दिलं आहे. मोहम्मद सिराजने रोहित शर्माला चुकीचं ठरवत म्हणाला की, नव्या आणि जुन्या अशा दोन्ही चेंडूने कामगिरी चांगली राहिली आहे. आकडेवारीतून ही गोष्ट सिद्ध होते. आयपीएलच्या नव्या पर्वात मोहम्मद सिराज हा गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. या स्पर्धेपूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोहम्मद सिराजने चॅम्पियन्स ट्रॉफीत डावलण्यासाठी रोहित शर्माने दिलेलं कारण फेटाळून लावलं आहे.
मोहम्मद सिराजने सांगितलं की, ‘मागच्या वर्षी जुन्या चेंडूने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जगातील पहिल्या दहा वेगवान गोलंदाजांमध्ये माझं नाव आहे. इकोनॉमी रेटही कमी आहे. आकडेवारीवरून ही गोष्ट सिद्ध होते. मी नव्या आणि जुन्या अशा दोन्ही चेंडूंनी चांगली कामगिरी केली आहे.’ मोहम्मद सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफीतील संघातून डावलल्यानंतर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. तेव्हा टीमची घोषणा करताना कर्णधार रोहित शर्माने सांगितलं होतं की, सिराज जुन्या चेंडूने गोलंदाजी करत नाही. त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होतो. ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेनंतर मोहम्मद सिराज संघातून बाहेर आहे. या मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेतूनही त्याला बाहेर केलं होतं. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्या ऐवजी अर्शदीप सिंग आणि हार्षित राणा यांना संधी मिळाली होती.
आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मोहम्मद सिराजला रिलीज केलं होतं. मागच्या सात पर्वात तो संघाचा महत्त्वाचा भाग होता. मात्र यावेळी आरसीबीने त्याला संघात न ठेवण्याचा निर्णय घेतला. मेगा लिलाावत गुजरात टायटन्सने 12.25 कोटी रुपये मोजत त्याला संघात घेतलं. मोहम्मद सिराज नव्या संघात दिसणार आहे. गुजरात टायटन्सचा पहिला सामना 25 मार्चला पंजाब किंग्सशी होणार आहे.