मुंबई: विराट कोहलीची (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. ग्रोइनच्या दुखापतीमधून सावरल्यानंतर विराट कोहलीचा दुसऱ्या वनडे (ODI) मध्ये संघात समावेश करण्यात आला. पण दुसऱ्या वनडेतही विराटची बॅट तळपली नाही. त्याने फक्त 16 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन चौकार लगावले. याआधी इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरीज मध्येही विराट फ्लॉप ठरला. विराट कोहलीवरुन सध्या भारताच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच दोन गट पडलेत. काही जणांना वाटतय की, विराट कोहलीने ब्रेक घेतला पाहिजे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने (babar Azam) या कठीण काळात विराट कोहलीसाठी एक खास संदेश पाठवला आहे. बाबर आजमने विराटचं समर्थन केलय. अनेकदा बाबर आजमची विराटशी तुलना केली जाते.
लॉर्ड्सवर विराट कोहली 16 धावांवर आऊट झाला. त्यानंतर बाबर आजमने टि्वटरवर एक स्पेशल पोस्ट केलीय. ‘ही वेळही निघून जाईल, मजबूत रहा’ असा संदेश लिहिताना त्याने विराट सोबतचा एक फोटोही पोस्ट केलाय. कालच्या सामन्यात भारताने टॉस जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली. इंग्लंडचा डाव 246 धावात आटोपला. मोइन अलीने इंग्लंडकडून सर्वाधिक 47 धावा केल्या. डेविड विलीने 41 आणि जॉनी बेयरस्टोने 38 धावा केल्या. युजवेंद्र चहलने 47 धावा देत भारताकडून सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. लॉर्ड्सवर वनडेत चार विकेट घेणारा युजवेंद्र चहल भारताचा पहिला गोलंदाज बनला आहे. त्याच्याआधी भारताचा अन्य गोलंदाज अशी कामगिरी करु शकलेला नाही.
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
भारत आणि इंग्लंड़ दुसरा एकदिवसीय सामना झाला. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताचा 100 धावांनी दारुण पराभव केला. रीस टॉपली इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भारताचं कंबरड मोडलं. पहिल्या वनडेत भारतासाठी जसप्रीत बुमराहने जशी कामगिरी केली होती, दुसऱ्या वनडेत रीस टॉपलीने इंग्लंडसाठी ते करुन दाखवलं. त्याने 9.5 षटकात 24 धावा देत 6 विकेट घेतल्या. यात दोन 2 निर्धाव षटकं होती. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने आधी 1-0 अशी आघाडी घेतली होती. इंग्लंडने आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रविवारी होणारा तिसरा एकदिवसीय सामना निर्णायक ठरेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव 49 षटकात 246 धावांवर आटोपला. भारताचा डाव 146 धावांवर संपुष्टात आला.