मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन एमएस धोनीवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या प्रसिद्ध कोकिलाबेन रुग्णालयात धोनीवर ही शस्त्रक्रिया झाली. दोन दिवसांपूर्वी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 च्या सीजनच विजेतेपद मिळवलं होतं. आयपीएलमधील CSK च हे पाचव विजेतेपद आहे. सीएसकेने ट्रॉफी जिंकून मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदाची बरोबरी केली आहे.
चेन्नईला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर धोनीने त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. कालच एमएस धोनीला रुग्णालयात दाखल करण्यात येईल, त्याची शस्त्रक्रिया होऊ शकते, अशा बातम्या येत होत्या.
धोनीला होणार त्रास दिसत होता
आज 1 जून रोजी सकाळीच एमएस धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. धोनीला आयपीएलचा सीजन चालू असताना, गुडघे दुखापतीचा त्रास होत होता. धोनीला होणार त्रास दिसत होता. त्यामुळे रनिंग बिटविन द विकेट धावा पळून काढताना धोनीला अडचणी येत होत्या. या दुखापतीमुळेच धोनी डावाच्या अखेरीस 10-12 चेंडू बाकी असताना बॅटिंगला यायचा.
कुठल्या डॉक्टरने एमएस धोनीवर ऑपरेशन केलं?
आता या गुडघे दुखापतीच्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी एमएस धोनीने शस्त्रक्रिया करुन घेतल्याची माहिती आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलचे डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी एमएस धोनीवर ऑपरेशन केलं. ते कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये स्पोर्ट्स मेडिसनचे अध्यक्ष आहेत.
याच डॉक्टरने टीम इंडियाच्या आणखी एका क्रिकेटपटूच ऑपरेशन केलय
डॉ दिनशॉ पारदीवाला यांनीच काही महिन्यापूर्वी टीम इंडियाच्या एका क्रिकेटवर शस्त्रक्रिया केली होती. त्यांनी रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतवर शस्त्रक्रिया केली होती. आता त्यांनी एमएस धोनीवर ऑपरेशन केलय. पंतच्या गुडघ्यावर तब्बल 3 तास ऑपरेशन सुरु होतं. पंतच्या उजव्या पायाचा लिगामेंट अपघातात फाटला होता.