कसोटीत भारताला भारतातच पराभूत करणं तसं खूप कठीण आहे. असं गेल्या अनेक वर्षात पाहिलं गेलं आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तसं घडलं आहे. न्यूझीलंडने भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करत मालिका खिशात घातली आहे. त्याचबरोबर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न अजून लांबलं आहे. त्यामुळे आता पुढच्या सहा सामन्यात कसोटी लागणार आहे. भारताला सहा पैकी चार सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठता येईल. मात्र त्यापैकी पाच सामने हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी काही अंशी आपल्या मनाची स्थिती तयार केली आहे. तत्पूर्वी दुसऱ्या सामन्यातील पराभव आणि मालिका गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याने पहिलाच शब्दातच निराश झाल्याचं सांगितलं आहे. कारण त्याला माहिती आहे आता पेपर किती कठीण आहेत ते.. दरम्यान त्याने या पराभवाचं विश्लेषण करताना नेमकं काय चुकलं ते सांगून टाकलं.
कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘खूपच निराशा झाली. आम्हाला अपेक्षित होतं असं काहीच घडलं नाही. याचं संपूर्ण श्रेय न्यूझीलंड संघाला जातं. ते आमच्यापेक्षा चांगले खेळले. काही संधींचं सोनं करणं आम्हाला जमलं नाही. आम्ही आव्हानांचा सामना करण्यास अपयशी ठरलो. त्यामुळेच आज आमची अशी गत झाली आहे. स्पष्ट सांगायचं आम्ही हवी तशी फलंदाजीच केली नाही, त्यामुळे बोर्डवर धावा लागल्या नाहीत. जिंकण्याासाठी तुम्हाला 20 विकेट घेणं गरजेचं आहे. पण तशा धावाही बोर्डवर लागल्या पाहीजेत. त्यांना 250 धावांवर रोखणं उत्तम लढत होती. पण हे आव्हानात्मक होतं हे आम्हाला माहिती होतं. पहिल्या डावात 200 वर 3 विकेट अशी स्थिती होती. गोलंदाजांनी त्याने 259 सर्वबाद केलं ही मोठी गोष्ट होती. खेळपट्टीचा यात तसा काहीच रोल नाही. पण फलंदाजी करू शकलो नाही. मला असं वाटते की पहिल्या डावात आम्ही आणखी धावा करायला हव्या होत्या.’
“वानखेडे मैदानावर आम्ही यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तसेच शेवटचा कसोटी सामना जिंकू. मालिका गमावणं हे आमचं सामूहिक अपयश आहे. मी या पराभवासाठी कोणा एकाला जबाबदार धरू शकत नाही. यासाठी बॉलर किंवा बॅटर जबाबदार आहे असं सांगू शकत नाही. आम्ही पुढच्या सामन्यात पुन्हा एकदा उभारू घेऊ. चांगल्या आयडियांसह उतरू आणि वानखेडेत त्याची अंमलबजावणी करू.”, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला आहे.