मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. असं क्रिकेटमय वातावरण असताना श्रीलंकेत क्रिकेटवरून राजकारण तापलं आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत श्रीलंकेच्या सुमार कामगिरीवरून राडा सुरु आहे. श्रीलंकेच्या फ्लॉप शोसाठी माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावर टीका केली होती. त्यावरून तेव्हा बराच वादंग झाला होता. आताही हा वाद सुरुच आहे. आता श्रीलंकन सरकारने या प्रकरणी जय शाह यांची माफी मागितली आहे. शुक्रवारी संसदेत बोलताना मंत्री हरिन फर्नांडो आणि कंचना विजेसेकरा यांनी याप्रकरणी खेद व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणात श्रीलंकेतील प्रशासकांचा दोष असताना इतरांना दोषी धरणं चुकीचं आहे. त्यामुळे श्रीलंकेत क्रिकेटवरून सुरु असलेलं राजकारण काही संपताना दिसत नाही.
मंत्री विजेसेकरा यांनी सांगितलं की, “आम्ही एक सरकार म्हणून आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शाह यांची माफी मागतो. आपल्या चुकांसाठी आशियाई क्रिकेट परिषद सचिव आणि इतर देशांना दोषी धरणं योग्य नाही. असं वागणं चुकीचं आहे.” दरम्यान पर्यटन मंत्री हरिन फर्नांडो यांनी सांगितलं की, ‘राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे लवकरच श्रीलंकन बोर्डावर आयसीसीने लावलेल्या निर्बंधाप्रकरणी जय शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. ‘
“श्रीलंक क्रिकट बोर्डावर आयसीसीने घातलेले निर्बंध योग्य नाहीत. निर्बंधामुळे जानेवारीत होणाऱ्या अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपवर प्रभाव पडेल. आयसीसीने निर्बंध हटवले नाही तर कोणत्याही संघांनी स्पर्धेसाठी श्रीलंकेत येऊ नये. श्रीलंकन क्रिकेट बोर्ड स्पर्धेतून एकही पैसा कमावणार नाही.”, असंही हरिन फर्नांडो यांनी सांगितलं.
श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी जय शाह यांच्यावर श्रीलंकन क्रिकेट बोर्ड ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि जय शाह यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे बीसीसीआय श्रीलंकन बोर्डावर नियंत्रण ठेवत असल्याचं दिसत आहे. त्यांना श्रीलंकेतील क्रिकेट संपवायचं आहे असंच समोर येत आहे. जय शाह श्रीलंकन क्रिकेट चालवत आहे. जय शाह यांच्या दबावामुळेच श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची पुरती वाट लागली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.