टीम इंडियाच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी थेट ड्रेसिंग रुममध्ये, निराश शमी सांत्वन केल्यानंतर म्हणाला…
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचं स्वप्न अंतिम सामन्यात भंग झालं. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्ट दिसत होतं. मैदानातील प्रेक्षक वर्गही शांत होता. असं सर्व भयाण वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेतली.
मुंबई : वनडे वर्ल्डकप जेतेपद भारतच जिंकणार असा प्रत्येक भारतीयाला वाटत होतं. पण अंतिम सामन्यात भ्रमनिरास झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाचं तिसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. कर्णधार रोहित शर्मा याला तर अश्रू अनावर झाले. मैदानातून थेट ड्रेसिंग रुममध्ये धाव घेत त्याने भावनांना मोकळी वाट करून दिली. एकंदरीत मैदानात अशी स्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेतली. इतकंच काय तर खेळाडूंचं मनोबळ देखील वाढवलं. या दरम्यान त्यांनी मोहम्मद शमीला मिठीत घेतलं आणि निराश होऊ नका असं सांगितलं. मोहम्मद शमीने हा फोटो आता सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
काय म्हणाला मोहम्मद शमी?
‘दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडिया आणि माझं समर्थन केल्याप्रकरणी भारतीयांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये येऊन आमचं मनोबळ वाढवलं. त्यांचा मी आभारी आहे. आम्ही निश्चितपणे पुन्हा परतू आणि चांगली कामगिरी करू.’, असं ट्वीट मोहम्मद शमी याने केलं आहे.
Unfortunately yesterday was not our day. I would like to thank all Indians for supporting our team and me throughout the tournament. Thankful to PM @narendramodi for specially coming to the dressing room and raising our spirits. We will bounce back! pic.twitter.com/Aev27mzni5
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 20, 2023
मोहम्मद शमीला सुरुवातीच्या चार सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर शमीला संधी मिळाली. त्या संधीचं शमीने सोनं केलं. सात सामन्यात 24 गडी बाद करत अव्वल गोलंदाज ठरला. भारतासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम झहीर खानच्या नावावर होता.
We had a great tournament but we ended up short yesterday. We are all heartbroken but the support of our people is keeping us going. PM @narendramodi’s visit to the dressing room yesterday was special and very motivating. pic.twitter.com/q0la2X5wfU
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 20, 2023
फिरकीपटू रवींद्र जडेजा यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासोबत फोटो शेअर केला आहे.जडेजाने फोटो पोस्ट करताना लिहिलं आहे की, ‘संपर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी राहिली आहे. पण अंतिम फेरीत हवी तशी कामगिरी झाली नाही. टीम निराश होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये येऊन संघाचं मनोबळ वाढवलं.’