वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या पत्नीनं पहिल्यांदाच केली अशी पोस्ट, मनातलं सर्वकाही सांगून टाकलं
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना गमवल्याची सळ अजून काही केल्या कमी होत नाही. स्पर्धेत सलग विजय मिळवत अंतिम फेरी गाठली खरी पण शेवट मात्र कडू झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. यामुळे रोहित शर्मासह इतर खेळाडूंना अश्रू अनावर झाले. आता कुठे गाडी रुळावर यायला लागली आहे. आता रोहित शर्माच्या पत्नीने एक पोस्ट करत मन की बात सांगितली आहे.

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवामुळे कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला. अंतिम फेरीत भारतीय संघ बाजी मारेल अशीच आशा होती. पण तसं झालं नाही. शेवटच्या सामन्यात नियतीच्या मनात भलतंच काही होतं. पॅट कमिन्सने लाखो भारतीयांना गप्प करण्याची शपथ खरी करून दाखवली. विराट कोहली बाद झाल्यानंतर तसंच घडत गेलं आणि ऑस्ट्रेलियाने विजयी चौकार मारेपर्यंत तसंच अनुभूती आली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यालाही अश्रू अनावर झाले. हातातोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेल्यानंतर ड्रेसिंग रुमकडे धाव घेत अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या पराभवाला आज दहा दिवस पूर्ण झाले आहे. दहा दिवसानंतर रोहित शर्माची पत्नी रीतिका हिने एक पोस्ट केली आहे आणि फोटोखाली एक कॅप्शन लिहिली आहे.
सोशल मीडियावर हा फोटो आता वेगाने वायरल होत आहे. रोहित शर्मा बऱ्याच गोष्टी विसरतो असं संघातील खेळाडूंनी अनेकदा समोर आणलं आहे. पण हा पराभव विसरणं रोहित सर्माला कठीण आहे. कर्णधार रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. फोटोत रोहित शर्माच्या चेहऱ्यावर हसू असल्याचं दिसत आहे. तसेच पत्नीने फोटोखाली ‘माय बॉय’ अशी कॅप्शन लिहिली आहे.
रोहित शर्मा दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार की नाही? हे अजून ठरलेलं नाही. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआय रोहित शर्माची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. बीसीसीआय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा करणार आहेत. मागच्या वर्षी टी20 वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीतील पराभवानंतर रोहित शर्माने कर्णधारपद सोडल्याची चर्चा आहे. पण 2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया टी20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. 3 सामन्यांची टी20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन 2023-25 च्या दृष्टीने कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता संघात कोणते खेळाडू खेळणार? याबाबत क्रीडाविश्वात चर्चा रंगली आहे.