Rohit Sharma : वनडे वर्ल्डकपनंतर रोहित शर्माचं टीम इंडियात कमबॅक, दोन सामन्यात करणार नेतृत्व
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पराभवानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. रोहित शर्मा दोन सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्त्व करणार आहे. बीसीसीआयने दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यात रोहित शर्माकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. व्हाईट बॉल क्रिकेट खेळणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. पण बीसीसीआयने घोषित केलेल्या टेस्ट संघाचं रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. अनुभवी फलंदाज असल्याने त्याच्याकडे आता मोठी धुरा असणार आहे. टीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेत चमकदार कामगिरी केली आणि दोन्ही सामने जिंकले तर पहिलं स्थान गाठता येणार आहे. टीम इंडियाने दोन वेळा टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत गाठली. मात्र दोन्ही वेळा टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या टीम इंडियाला न्यूझीलंडने, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं आहे.
रोहित शर्मासोबत वनडे वर्ल्डकप संघात असलेले बऱ्यापैकी सर्वच खेळाडू या चमूत आहेत. यात शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू वनडे वर्ल्डकप संघात होते.
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका पहिला कसोटी साना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. दक्षिण अफ्रिकेने 2023-2025 टेस्ट साखळीतील एकही सामना खेळलेला नाही. भारतासोबत दक्षिण अफ्रिकेची पहिलीच लढत असणार आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळलेला आहे. भारत 66.67 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, तर दक्षिण अफ्रिकन संघ आठव्या स्थानावर आहे.
टीम इंडिया टेस्ट टीम
कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.