IPL 2024 : अंबाती रायडूची मोठी भविष्यवाणी, धोनीनंतर जडेजा नाहीतर ‘या’ खेळाडूला द्यायला हवी कॅप्टन्सी
CSK Captain After MS Dhoni : आयपीएलमध्ये सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांनी सर्वाधिकवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे धोनीनंतर कोणत्या खेळाडूकडे जबाबदारी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी महेंद्र सिंह धोनीनंतर कोणाची वर्णी लागणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा होताना दिसते. धोनीचा 2014 हा शेवटचा हंगाम असू शकतो, त्यामुळे धोनीनंतर संघाच्या कर्णधारपदाची जबाबादारी कोणाकडे दिली जाणार याबाबत माजी खेळाडूने भविष्यवाणी केलीये. याआधी सीएसकेने जडेजाकडे कर्णधापद देऊन पाहिलं होतं. मात्र तो प्रयोग फसला होता, माजी खेळाडू अंबाती रायडू असून त्याने मराठमोळ्या खेळाडूचं नाव घेतलं आहे.
कोण आहे तो खेळाडू?
द रणवीर शो मध्ये अंबाती रायडू याला धोनीनंतर सीएसकेच्या कर्णधारपदाची धुरा कोणाकडे द्यायची हा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, मला वाटतं की ही जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्याकडे द्यायला हवी पण बघूया पुढे काय होतं, असं रायडूने उत्तर दिलं.
प्रत्येकाला माहित आहे की धोनीने सर्व फॉरमॅटमध्ये अनेक खेळाडूंकडूंन दमदार कामगिरी करून घेतली आहे. सीएसकेकडून खेळणाऱ्या विदेशी खेळाडूंकडूनही धोनीने चांगलं प्रदर्शन करून घेतलं आहे. मला वाटतं की धोनीची तीच खासियत असून त्याबद्दल शब्दात नेमकं कशा प्रकारे व्यक्त होऊ हे मला समजत नाही. धोनीला तो आशीर्वादच आहे असं म्हणावं लागेल किंवा तो जितकं क्रिकेट खेळलाय त्यातून त्याने हे कौशल्य आत्मसात केलं असावं, असं अंबाती रायडूने म्हटलं आहे.
धोनीने घेतलेले निर्णय अनेकवेळा चुकीचे घेत आहे असं वाटायचं मात्र त्याने घेतलेले 99.9 निर्णय हे योग्य ठरल्याचं रायडू म्हणाला. अंबाती रायडू मुंबई इंडियन्सनंतर सीएसकेच्या ताफ्यात गेला होता. सीएसकेसाठी त्याने चांगली कामगिरी केलीये. रायडूने ऋतुराजचं कर्णधारपदासाठी नाव घेतलं असून त्याची आयपीएलमधील कामगिरी पाहा.
ऋतुराज गायकवाडने 2020 मध्ये CSK कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने 2021 मध्ये 16 सामन्यात 635 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. 2021 आणि 2023 सीएसकेने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलेलं यामध्ये गायकवाड याने मोलाची भुमिका बजावली होती.