Ambati Rayudu : BCCI अध्यक्षाच्या मुलामुळे माझं करिअर झालं बर्बाद, अंबाती रायडूचा सर्वात गंभीर आरोप!
अंबातीला काहीच सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. निवड झाल्यावर तो कायम आत-बाहेर होताना दिसला. अशातच अंबाती रायडू याने बीसीसीआयच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केला आहे.
मुंबई : स्टार खेळाडू अंबाती रायडू याने यंदाच्या आयपीएलनंतर क्रिकेटधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही त्याला टीम इंडियाकडून संधी मिळाली नाही. अनेकांनी यावरून बीसीसीआयवर ताशेरे ओढले. मात्र काळ लोटला आणि अंबातीला काहीच सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. निवड झाल्यावर तो कायम आत-बाहेर होताना दिसला. आता राजकारणामध्ये अंबाती उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र अशातच अंबाती रायडू याने बीसीसीआयच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केला आहे.
बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी आपल्या मुलाचे करिअर घडवण्यासाठी माझं करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप अंबाती रायडूने केला आहे. इतकंच नाहीतर त्याने मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांच्यावरही आरोप केला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना रायडूने गंभीर आरोप केले आहेत.
अंबाती रायडूचे नेमके कोणावर आरोप?
भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू म्हणाला की, मी लहान असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये राजकारण सुरू झाले. शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुन यादव याला टीम इंडियामध्ये भरवल्याबद्दल माझा छळ झाला. मी अर्जुन यादवपेक्षा चांगला खेळत होतो, त्यामुळेच त्याने मला हटवण्याचा प्रयत्न केला. 2003-04 मध्ये मी इंडिया-अ साठी चांगली कामगिरी केली होती. पण 2004 मध्ये निवड समिती बदलली आणि शिवलाल यादव यांच्या जवळचे लोक त्यात सामील झाले, त्यामुळे मला संधी मिळाली नसल्याचं रायडू म्हणाला.
जवळपास 4 वर्षे मला कोणाशी बोलू दिलं नाही. शिवलाल यादव यांच्या लहान भावाने अनेकवेळा मला शिवीगाळ केली होती. त्यावेळी मी खूप तणावाखाली होतो. त्यामुळे मला हैदराबाद सोडून आंध्र प्रदेशात जावं लागलं. मात्र तिथेही आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार प्रसाद यांच्याशी त्याचे मतभेद झाले आणि पुन्हा हैदराबादमध्ये आल्याचं रायडूने सांगितलं.
दरम्यान, 2010 मध्ये रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडिअन्स संघाकडून खेळू लागला. संघामध्ये कीपर म्हणून खेळताना अनेक महत्त्वाच्या खेळी त्याने करत संघासाठी मोठं योगदान दिलं होतं. 2019 च्या वर्ल्ड कपवेळी खेळाडी दुखपती झाल्यावर त्याला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला विश्वचषकाची तयारी करण्यास सांगितले होते. पण त्यावेळी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी रायडूऐवजी विजय शंकरला पसंती दिल्याचा आरोप रायडूने केलाय.