मुंबई: चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाज अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) आयपीएलच्या (IPL) या सीजननंतर निवृत्तीची घोषणा केली होती. पण 10 मिनिटात तो आपल्या निर्णयावरुन पलटला. अंबाती रायुडूने टि्वट करुन हे शेवटचं आयपीएल असल्याचं म्हटलं होतं. 13 वर्षांचा हा प्रवास खूप सुंदर होता, असं त्याने लिहिलं होतं. रायुडूच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर वेगाने तो निवृत्त होणार असल्याची बातमी पसरली. त्यानंतर 10 मिनिटात त्याने निवृत्तीचं टि्वट डिलीट केलं. रायुडूने टि्वट डिलीट केल्यानंतर CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी अंबाती रायुडू सन्यास घेत नसल्याची माहिती दिली. “मी आनंदाने घोषणा करतो की, ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा आहे. मागची 13 वर्ष मी दोन चांगल्या संघांसोबत होतो. या शानदार प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा आभारी आहे” असं त्याने टि्वटमध्ये म्हटलं होतं.
अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा करणं आणि त्यानंतर दहा मिनिटात टि्वट डिलीट करणं यावरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पहिला प्रश्न म्हणजे चेन्नई आणि अंबाती रायुडूमध्ये सर्व ठीक आहे ना?. रवींद्र जाडेजाने चेन्नईची साथ सोडली आहे. जाडेजा चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंटवर नाराज होता. आता रायुडूने निवृत्तीची घोषणा केली नंतर माघार घेतली. त्यानंतर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. हे सर्व संशयास्पद आहे.
IPL 2022 मध्ये भले अंबाती रायुडूला सीएसकेने रिटेन केलं नव्हतं. पण ऑक्शनमध्ये 6.75 कोटी रुपये मोठी रक्कम मोजून त्याला विकत घेतलं. रायुडूने आतापर्यंत 10 डावात 27.10 च्या सरासरीने 271 धावा केल्या आहेत. 124 त्याचा स्ट्राइक रेट आहे.
रायुडूने आतापर्यंत 187 आयपीएल सामन्यात 29.28 च्या सरासरीने 4187 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 22 अर्धशतक आहेत. 2018 मध्ये त्याने सर्वोत्तम प्रदर्शन केलं. त्याने 16 सामन्यात 43 पेक्षा जास्त सरासरीने 602 धावा करुन तिसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. पाच आयपीएल विजेतेपदाचं सुख रायुडूच्या नशिबी आलं. मुंबई इंडियन्सकडून तीनदा तर सीएसकेकडून दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघात तो होता.