Indian Cricket Team | क्रिकेट टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा हेड कोच
Indian Cricket Team Head Coach | क्रिकेट टीम इंडियाला लवकरच नवा हेड कोच मिळणार आहे. दिग्गज खेळाडूकडे हेड कोचपदाची धुरा देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसात वूमन्स क्रिकेट टीम इंडियाचा हेड कोचपदी दिग्गजाची निवड करण्यात येणार आहे. डोमेस्टिक क्रिकेटमधील किंग मुंबईकर अमोल मुजूमदार यांची टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणं जवळपास निश्चित झालंय. मुंबईत सोमवारी क्रिकेट सल्लागार समितीकडून या पदासाठी मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत अमोल मुजूमदारने सल्लागार समितीतील अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांना प्रभावित केलं.
रमेश पोवार याच्या जागी मुजूमदार
टीम इंडिया मुख्य प्रशिक्षक पदासाठी इतरांनीही मुलाखत दिली. यामध्ये डरहम टीमचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांचाही समावेश आहे. आरोठे यांनी 2018 साली पदाचा राजीनामा दिला. त्याआधीही आरोठे यांनी टीम इंडियाच्या हेड कोच म्हणून जबाबदारी पार पाडली होती. डिसेंबर 2022 मध्ये रमेश पोवार यांची बंगळुरुतील एनसीए इथे पाठवण्यात आलं. तर ऋषिकेश कानिटकर यांची वूमन्स टीम इंडियाच्या बॅटिंग कोचपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून मुख्य प्रशिक्षक पद हे रिक्त आहे.
कोचिंगचा तगडा अनुभव
“अमोल मुजूमदार यांनी मुलाखतीत क्रिकेट सल्लागार समितीसमोर वूमन्स टीम इंडियाबाबत भविष्यातील योजनांचं सादरीकरण केलं. यामुळे सल्लागार समिती चांगलीच प्रभावित झाली. त्यामुळे मुजूमदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.”, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.
अमोल मुजूमदार यांना प्रशिक्षकपदाचा दांडगा आणि तगडा अनुभव आहे. मुजूमदार नुकत्याच पार पडलेल्या रणजी टीमचे हेड कोच होते. तसेच आयपीएलमध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय संघातही जबाबदारी पार पाडलीय.
लवकरच नियुक्तीची शक्यता
वूमन्स टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या बांगलादेश दौऱ्याआधी मुजूमदार यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाऊ शकते. मुजूमदार यांच्या पदाचा कार्यकाळ हा 2 वर्षांचा असू शकतो.
वूमन्स टीम इंडियाचा बांगलादेश दौरा
वूमन्स टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याला अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. बांगलादेश विरुद्ध वूमन्स टीम प्रत्येकी 3-3 सामन्यांची टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने रविवारी 2 जुलै रोजी भारतीय संघ जाहीर केला. या दौऱ्यात हरमनप्रीत कौर कर्णधार आणि स्मृती मंधाना उपकर्णधार पदाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, रविवार 9 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.
दुसरा सामना, मंगळवार 11 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.
तिसरा सामना, गुरुवार 13 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे, रविवार 16 जुलै, सकाळी 9 वाजता.
दुसरी वनडे, बुधवार 19 जुलै, सकाळी 9 वाजता.
तिसरी वनडे, शनिवार 22 जुलै, सकाळी 9 वाजता.
बांगलादेश विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य,अमनजोत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, उमा चेत्री (विकेटकीपर), राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी आणि मिन्नू मणी.
बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (सी), स्मृती मानधना (व्हीसी), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सरवाणी, मोनिका पटेल, स्नेह राणा, उमा चेत्री (विकेटकीपर), राशी कनोजिया आणि अनुषा बरेड्डी.