द्रविड ब्रदर्सचं वडिलांच्या पावलावर पाऊल! समितनंतर अन्वयचं नशिब फळलं
भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या दोन्ही मुलांनी पावलावर पाऊल टाकलं आहे. दोघंही क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. मोठी मुलगा कूच बिहार ट्रॉफीत खेळत आहे. तर लहान मुलानेही आपली जागा बनवण्यास सुरुवात केली आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या दोन्ही कारकिर्दीत नावलौकिक मिळवला आहे. क्रिकेटमध्ये द्रविडच्या नावाची द वॉल म्हणून ख्याती कायम आहे. आता राहुल द्रविड आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा मार्गदर्शक झाला आहे. असं असताना द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवत दोन्ही मुलं पुढे सरसावत आहेत. वडिलांच्या नावाचं वजन असलं तरी दोघंही आपल्या परीने चांगली कामगिरी करत आहेत. राहुल द्रविडचा मोठी मुलगा समित कूच बिहार ट्रॉफीत खेळत आहे. आता छोटा मुलगा अन्वयकडून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. राहुल द्रविडचा छोटा मुलगा अन्वय द्रविड विकेटकीपर बॅट्समन आहे. त्याचं नाव 6 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या अंडर 16 विजय मर्चंट ट्रॉफीसाठी कर्नाटकच्या 35 सदस्यांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत सहभागी झालं आहे. या यादीत तीन विकेटकीपर अन्वय एक आहे.
अन्वय द्रविड नुकताच केएससीए अंडर 16 इंटर झोनल स्पर्धेत बंगळुरु झोनकडून खेळला होता. या स्पर्धेत त्याने तुमकूर झोनविरुद्ध नाबाद द्विशतक ठोकलं होतं. आता त्याला अंडर 16 विजय मर्चेंट ट्रॉफीसाठी मेन्स स्क्वॉडमध्ये निवडलं जाऊ शकतं. पूर्व राज्य खेळाडू कुणाल कपूर आणि आदित्य बी सागर विजय मर्चेंट ट्रॉफीसाठी अंडर 16 संघाचे हेड कोच आणि गोलंदाज कोच असणार आहे.
दुसरीकडे, समित द्रविडने कूच बिहार ट्रॉफीमध्ये कर्नाटकसाठी खेळताना बरोडाविरुद्ध जबरदस्त खेळी केली. या सामन्यात कर्नाटकला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. असं असलं तरी समितची खेळी लक्षवेधी ठरली. समितने 141 चेंडूंचा सामना करत 71 धावा केल्या. समित द्रविडने यावेळी 11 चौकार मारले. याच सामन्यात समित पहिल्या डावात 20 चेंडू खेळत 8 धावा करून बाद झाला होता.
दरम्यान, राहुल द्रविड आयपीएलमध्ये परतला आहे. राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा आता खांद्यावर आहे. मोठ्या कालावधीनंतर राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीत परतला आहे. राहुल द्रविड एक खेळाडू म्हणून या फ्रेंचायझीकडून खेळला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आयपीएल मेगा लिलावात खेळाडू निवडीत राहुल द्रविडची मुख्य भूमिका असणार आहे.