WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या पहिल्या सामन्यातच इंग्लड आणि ऑस्ट्रेलियाला फटका, आयसीसीने केलं असं की…
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठी अॅशेस मालिकेने सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्याचा निकाल लागला असला तरी दोन्ही संघांना मोठी किंमत मोजावी लागली आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अॅशेस मालिका सुरु झाली आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2 गडी आणि 27 चेंडू राखून विजय मिळवला आहे. या विजयासह मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेच्या दृष्टीकोनातून पहिलं पाऊल आहे. मात्र असं असताना दोन्ही संघांना आयसीसीने जोरदार दणका दिला आहे. आयसीसीच्या कारवाईमुळे दोन्ही संघांना सरतेशेवटी किंमत मोजावी लागू शकते. थोड्याशा फरकाने अंतिम फेरीतील स्थान गमवावं लागू शकतं. पहिल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. दोन्ही संघांना दोन गुणांचा फटका बसला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून सामना जिंकणाऱ्या संघाला 12 आणि पराभूत झालेल्या संघाला 0 गुण दिले जातात. मात्र आयसीसीने केलेल्या कारवाईमुळे ऑस्ट्रेलियाला जिंकूनही 10 गुण, तर इंग्लंडने सामना गमवल्याने पदरात -2 गुणांची भर पडली आहे.
? JUST IN: Australia and England have been handed crucial #WTC25 sanctions after the first #Ashes Test.
Details ?https://t.co/VmEz7pYKFU
— ICC (@ICC) June 21, 2023
दुसरीकडे, स्लो ओव्हर रेटमुळे खेळाडूंच्या सामना मानधनातून 40 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सांगितलं की, दोन्ही संघांनी ठरलेल्या वेळेनुसार दोन षटकं कमी टाकली आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी गुन्हा मान्य केला आहे.
आयसीसीने स्लो ओव्हररेटसाठी कठोर नियम केले आहेत. कारण षटकं टाकण्यास विलंब केला की खेळाचा खोळंबा होतो. तसेच इतर गणितं चुकतात. त्यामुळे स्लो ओव्हर रेट टाळण्यासाठी आयसीसीची कडक नियमावली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडने 8 गडी गमवून 393 धावा केल्या आणि डाव घोषित केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 386 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडला 7 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 273 धावांवर सर्वबाद झाला आणि 280 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमवून पूर्ण केलं.