ENG vs AUS 3rd Test | इंग्लंड तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पुरून उरली, कांगारुं विरुद्ध 3 विकेट्सने विजय
ENG vs AUS 3rd Test : इंग्लंडसाठी मालिकेतील आव्हान कायम राखण्यसाठी तिसरा सामना हा 'करो या मरो' असा होता. अखेर या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत आव्हान कायम राखलं.
मुंबई : इंग्लंडने प्रतिष्ठेच्या अॅशेस (Ashesh Series) मालिकेतील तिसरा कसोटी (Ashesh AUS vs ENG) सामना जिंकला आहे. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकले होते. त्यामुळे इंग्लंडसाठी मालिकेतील आव्हान कायम राखण्यसाठी तिसरा सामना हा ‘करो या मरो’ असा होता. अखेर या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत आव्हान कायम राखलं.
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी विजयासाठी 251 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 27 धावा केल्या होत्या. झॅक क्रॉली 9 आणि बेन डकेट 19 धावांवर नाबाद परतले होते. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी चौथ्या दिवशी आणखी 224 धावांची गरज होती. इंग्लंडने हे 251 धावांचे आव्हान 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक याने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील तिन्ही सामने रंगतदार झालेले पाहायला मिळाले. तिसऱ्याही सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव होतो की काय असं वाटत होतं. मात्र इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक हा संकटमोचक म्हणून आला. हॅरी ब्रूकने 93 चेंडूत 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये त्याने 9 चौकार मारले. तर दुसरीकडे ख्रिस वोक्स नाबाद 32 धावा आणि मार्क वूडने नाबाद 16 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलँड आणि टॉड मर्फी.