मुंबई: आशिया कप 2022 (Asia cup) मध्ये भारताचा सलामीचा सामना पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध होणार आहे. या लढतीला आता आठवड्याभराचा अवधी उरला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) या महामुकाबल्याची तयारी करतोय. कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या करीयरची खूप चांगली सुरुवात झालीय. पाकिस्तान विरुद्धचा हा सामना हाय-प्रेशर गेम असल्याचं रोहितने मान्य केलं. पण नवोदित खेळाडूंसमोर आदर्श निर्माण करणं, त्यांच्यात विश्वास निर्माण करणं, तितकच महत्त्वाचं असल्याचं रोहितने सांगितलं. पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी संघात सकारात्मक वातावरण निर्माण करणं, महत्त्वाचं असल्याचं रोहित म्हणाला.
“पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी खेळाडूंना उच्च दबाव जाणवणार नाही, तशी वातावरण निर्मिती करणं, कॅप्टन म्हणून मला महत्त्वाचं वाटतं. संघातील खेळाडूंना सहजता जाणवली पाहिजे. त्यांनी परस्पराच्या सोबतीचा आनंद घेतला पाहिजे, तशी वातावरण निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. खूप जास्त दबाव घेऊ नये, असं मला स्वत:ला वाटतं” असं रोहित शर्मा स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला.
“जेव्हा तुम्ही खेळता, तेव्हा तुमच्यावर दबाव असणं, स्वाभाविक आहे. चेंडू तुमच्या हातात असताना, गोलंदाज म्हणून तुमच्यावर दबाव असणार. मधल्याफळीत फलंदाजी करताना दबाव असणार, त्यावेळी तुमच्यावर असलेला दबाव तुम्हालाच हाताळायचा आहे. कॅप्टन, कोच किंवा अजून कोणी त्या मध्ये काहीच करु शकत नाही. ती तुमची जबाबदारी आहे. पण त्याचवेळी अन्य घटक सुद्धा खेळामध्ये महत्त्वाचे असतात. मला वाटतं, मला त्याची काळजी आम्ही घेतली पाहिजे” असं रोहित शर्मा म्हणाला.
भारत-पाकिस्तान या हाय वोल्टेज सामन्याआधी पाकिस्तानला एक झटका बसला आहे. पाकिस्तानचा स्टार डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिकी या स्पर्धेत खेळणार नाहीय. दुखापतीमुळे तो आशिया कपला मुकणार आहे. आफ्रिदीची गणना जगातील धोकादायक गोलंदाजांमध्ये होते. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानने भारताचा एकतर्फी पराभव केला होता. त्यानंतर आता दोन्ही संघ आमने-सामने येत आहेत. भारत त्या पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी उत्सुक्त आहे.