मुंबई: सध्या आशिया कप (Asia cup) स्पर्धा सुरु आहे. प्रत्येक संघ एक किंवा दोन सामने खेळला आहे. भारताने आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) खेळला. ऋषभ पंत (Rishabh Pant) त्या सामन्यात खेळेल असं सर्वांना वाटलं होतं. पण टीमच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली, त्यामध्ये त्याचं नाव नव्हतं. त्याच्याजागी दिनेश कार्तिकचा संघात समावेश करण्यात आला होता. ऋषभ पंतला प्लेइंग 11 मध्ये स्थान का मिळालं नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऋषभ पंतला दुखापत झालीय की, त्याला संघातून वगळण्यात आलय, हा प्रश्न विचारला जातोय. रवींद्र जाडेजाला पंत संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले. पण त्यालाही त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती.
हाँगकाँग विरुद्धच्या सामन्याआधी रवींद्र जाडेजाने पत्रकार परिषदेला संबोधित केलं. त्याला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. एक प्रश्न तर बाऊन्सर सारखा होता. यावर खेळण्याऐवजी त्या प्रश्नाला उत्तर न देणं म्हणजे डक करणच योग्य वाटलं.
ऋषभ पंतला दुखापत झालीय की, त्याला संघातून वगळण्या आलं, असा रवींद्र जाडेजाला थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जाडेजाने जे उत्तर दिलं, ते ऐकून सगळ्याच पत्रकारांना आपलं हसू आवरता आलं नाही. “या प्रश्नाच उत्तर माझ्या पुस्तकात नाहीय. माझ्या अभ्याक्रमाच्या बाहेरचा हा विषय आहे. मला या बद्दल कुठलीही कल्पना नाहीय” असं त्याने सांगितलं.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजाला प्रमोट करुन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. त्याने पंड्यासोबत मिळून आवश्यक भागीदारी केली व भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.