Asia Cup 2023 : पाकिस्तानला झटका, जय शाह यांनी ‘तो’ निर्णय घेतलाच
टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कप स्पर्धेच्या एका गटातच आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे सप्टेंबर 2023 मध्ये करण्यात आलं आहे. जय शाह यांनीच 2023-24 वर्षांचं क्रिकेट कॅलेंडर शेअर केलं होतं.
मुंबई : पाकिस्तान आणि टीम इंडिया एकमेकांचे चीर प्रतिद्वंदी. दोन्ही देशांमधील ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्यामुळे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेत आणि आशिया कप स्पर्धेत खेळतात. मात्र यावेळेस आशिया कपवरुन मोठा वाद सुरु झाला. टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. अखेर या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. बहरीनमध्ये पार पडलेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी तातडीने महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी होते. या बैठकीत जय शाह यांनी टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार की नाही, याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदावरुन हा सर्व वाद आहे. मात्र बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेचं यजमानपद मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. आशिया कप स्पर्धा सप्टेंबर महिन्यात नियोजित आहे.
“जय शाह एसीसीच्या बैठकीसाठी बहरीनमध्ये आहेत. पाकिस्तानला जाण्याबाबत बीसीसीयचा भूमिका ठाम आहे. बीसीसीआय भूमिका बदलणार नाही. केंद्र सरकारकडून आश्यक परवानगी न मिळाल्याने आम्ही पाकिस्तानला जाणार नाही”, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला दिली.
आशिया कपचं आयोजन कुठे?
याआधी पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेता हा सर्व खटाटोप सुरु आहे. यामुळे पाकिस्तानात आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाला वाढता विरोध आहे. त्यामुळे आता यूएई किंवा श्रीलंका या ठिकाणी आशिया कप स्पर्धा पार पडू शकते.
आशिया कप स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर जय शाह यांनी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलं होतं. तेव्हा तत्कालीन पीसीबी चेयरमन रमीज राजा यांनी आम्ही पण वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नसल्याची धमकीच दिली होती. यावरुन हा वादाला तोंड फुटलं होतं.