Asia Cup 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ‘करो या मरो’ची लढत, पावसाने व्यत्यय आणला तर कोणाला मिळेल फायनलचं तिकीट? जाणून घ्या
Asia Cup 2023 : आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने एन्ट्री मारली आहे. आता दुसऱ्या संघासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे.
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं चित्र स्पष्ट होत आहे. भारताने सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेला पराभूत केलं. 4 गुण आणि चांगल्या नेट रनरेटसह भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. तर बांगलादेशचं आव्हान आधीच संपुष्टात आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका या संघात अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. हा सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत भारताशी लढणार आहे. अंतिम फेरीचा सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. दुसरीकडे, आशिया कप स्पर्धेत वारंवार पावसाचा व्यत्यय येत आहे. याचा परिणाम काही सामन्यांवर पाहायला मिळाल आहे. भारत पाकिस्तान सामनाही राखीव दिवशी खेळणअयाची वेळ आली. अशात पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यात पावसाने हजेरी लावली तर कोणला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार? ते जाणून घेऊयात..
कसं असेल अंतिम फेरीसाठी गणित?
सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर गेला आहे. स्पर्धेचं यजमानपद असलेल्या पाकिस्तानला अंतिम फेरीत जाण्यासाठी काहीही करून श्रीलंकेला पराभूत करावं लागणार आहे. तर आणि तरच पाकिस्तानला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. दुसरीकडे, श्रीलंकेसाठीही असंच गणित असणार आहे. पण पावसाने हजेरी लावली तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये सामना होणार आहे. हा सामना गुरुवारी होणार असून या दिवशीही पावसाचं सावट आहे. 93 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या सामन्यासाठी रिझर्व्ह डे नसणार आहे. त्यामुळे पाऊस पडला आणि सामना थांबला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक पॉइंट दिला जाईल. त्यामुळे त्याचा थेट फायदा श्रीलंकन संघाला होणार आहे. कारण श्रीलंकेचा नेट रनरेट -0.200 इतका आहे. तर पाकिस्तानाचा नेट रनरेट -1.892 इतका आहे. त्यामुळे फायनलचं तिकीट श्रीलंकेला मिळेल.
अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत?
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ दोन वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानने श्रीलंका विरुद्धचा सामना जिंकला तर अंतिम फेरीत भारताशी गाठ असेल. असं झालं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच अंतिम फेरीचा सामना होईल. टीम इंडियाने 10 वेळा अंतिम फेरीत धडक मारली असून 7 वेळा जेतेपद जिंकलं आहे. अंतिम फेरीचा सामना 17 सप्टेंबरला होणार आहे.