कोलंबो : टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अंतिम सामना रविवारी विद्यमान विजेता श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्यांनी पाकिस्तानला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियासाठी फायनल मॅच खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाने मागच्या काही वर्षांपासून कुठलही विजेतेपद मिळवलेलं नाही. 2018 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया कप जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाला कुठलीही तिरंगी मालिका जिंकता आलेली नाही. पुढच्या महिन्यात वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी आशिया कपचा अंतिम सामना महत्त्वाचा आहे. टीम इंडियातील दोन खेळाडूंच्या सिलेक्शनवर टांगती तलवार आहे. हे दोन प्लेयर कोण आहेत? त्या बद्दल जाणून घ्या. आशिया कप 2023 च्या सुपर-4 राऊंडमध्ये टीम इंडियाचा शेवटचा सामना बांग्लादेश विरुद्ध झाला.
या मॅचमध्ये टीम इंडियाने प्लेइंग-11 मध्ये पाच बदल केले. टीम इंडियाला इतके बदल करण्याची किंमत चुकवावी लागली. बांग्लादेशने या मॅचमध्ये 6 रन्सनी विजय मिळवला. शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल दोघे या मॅचमध्ये खेळले. बांग्लादेश विरुद्ध जे प्लेयर बाहेर होते, निश्चित ते फायनलमध्ये खेळतील. त्याचवेळी शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल या दोघांपैकी एकाला संधी मिळेल. दोघे ऑलराऊंडर आहेत. त्यांच्यामुळे टीमची फलंदाजीची ताकत वाढते. त्यामुळे या दोघांपैकी एकाच खेळणं निश्चित आहे. टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देऊन प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमी यांची निवड केली. फायनलमध्ये सिराज आणि बुमराह यांचं पुनरागमन होईल. कुलदीप यादवही बांग्लादेश विरुद्धच्या मॅचमध्ये खेळला नव्हता. फायनलच्या प्लेइंग 11 मध्ये त्याला सुद्धा स्थान मिळेल.
रोहित-द्रविड काय निर्णय घेणार?
फायनलमध्ये टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज घेऊन खेळणार की, तीन फिरकी गोलंदाज याकडे लक्ष असेल. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांनी तीन स्पिनर्सना खेळवण्याचा निर्णय घेतला, तर अक्षर पटेलच खेळणं निश्चित आहे. सोबतील रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव असतील. फायनल कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होईल. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. त्यामुळे टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला, तर अक्षरला बाहेर बसवून शार्दुल ठाकूरचा समावेश केला जाईल.