IND vs PAK : आजच पूर्ण सामना होणार की राखीव दिवशी खेळवला जाणार? जाणून घ्या नियम
Asia Cup 2023, IND vs PAK : आशिया कप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यातही पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे एक दिवस राखून ठेवला आहे. पण 50 षटकांचा सामना होणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात पुन्हा एकदा पावासाने हजेरी लावली आहे. यामुळे क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे. हायव्होल्टेज सामना पाहण्याची उत्सुकतेवर पाणी फेरलं आहे. सुपर 4 फेरीत पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्यााच निर्णय घेतला. भारताने आश्वासक सुरुवात केली मात्र 24.1 षटकांचा सामना झाला आणि पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. 24.1 षटकात भारताने 2 गडी गमवून 147 धावा केल्या. यात रोहित शर्मा 56 आणि शुबमन गिल 58 धावा करून बाद झाले. तर विराट कोहली आणि केएल राहुल मैदानात खेळत आहेत. पाऊस पडेल असा अंदाज असल्याने एशियन क्रिकेट काउंसिलने यासाठी सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच आज सामना झाला नाही तर 11 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.
वनडे सामन्यांचा निकाल कसा लागतो?
वनडे सामन्याचा निकाल देण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 20 षटकं खेळणं आवश्यक आहे. जर हा सामना आजच संपवायचा असेल तर पाकिस्तानला कमीत कमी 20 षटकं खेळणं गरजेचं आहे. 20 षटकं पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ उरला नाही तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. म्हणजेच भारताला 24.1 षटकांपासून पुढे बॅटिंग करावी लागेल.
रिझर्व्ह डे बाबत काय आहे नियम?
आज 20 षटकं खेळण्याची स्थिती नसेल तर हा सामना सोमवारी म्हणजेच 11 सप्टेंबरला खेळवला जाईल. भारतीय संघाला 24.1 षटकांच्या पुढे सामना सुरु करावा लागेल. पावसाने व्यत्यय आणला नाही तर पाकिस्तानला पूर्ण 50 षटकं खेळायला मिळतील. त्याचबरोबर आज डकवर्थ लुईस नियमांनुसार षटकं कमी केली म्हणजेच 35 किंवा 40 षटकांचा सामना केला. पण पावसाने हजेरी लावल्याने एकही चेंडू टाकला नाही तर राखीव दिवशी पूर्ण 50 षटकांचा सामना होईल. कारण षटकं कमी केल्यानंतरही सामना सुरु झाला नसल्याने असा निर्णय घेतला जाईल.
दुसरीकडे, डकवर्थ लुईस नियमानुसार षटकं कमी केली गेली असतील. तसेच आज सामन्यात एक चेंडू जरी टाकला गेला तर मात्र 35 षटकांचाच सामना होईल. यात कोणताही बदल केला जाणार नाही.