IND vs PAK, Asia Cup : वा रे पठ्ठ्या..! इशान किशन याची पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त खेळी, ठोकलं सलग चौथं अर्धशतक
भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाची आघाडीची फलंदाजी ढेपाळली. वेगवान माऱ्यासमोर आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. मात्र इशान किशनने जबरदस्त खेळी केली.
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत टीम इंडियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. आघाडीला आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र पावसाने हजेरी लावताच सर्वच लय बिघडली. शुबमन गिल तर बॅटला चेंडू लागावा म्हणून धडपड करताना दिसला. अपेक्षेप्रमाणे शाहीन आफ्रिदीने गोलंदाजी केली आणि रोहित शर्मा याला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहलीही काही खास करू शकला नाही. अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला. श्रेयस अय्यरही स्वस्तात बाद झाल्याने शुबमन गिलकडून अपेक्षा वाढल्या. पण तोही त्रिफळाचीत होत तंबूत परतला आणि इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्यावर जबाबदारी आली. त्यांनी ही जबाबदारी काही अंशी पार पाडली.
इशान किशनची झुंजार अर्धशतकी खेळी
पाचव्या गड्यासाठी इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर इशाननं खेळपट्टीवर जम बसवत. पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला धावसंख्येची गती राखता आली. इशान किशन याने 54 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या खेळीत 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारताला मोठ्या खेळीची आवश्यकता असताना इशान किशन याने चांगली खेळी केली.
FIFTY!
A well made half-century by @ishankishan51 off 54 deliveries 👏👏
His 7th in ODIs!
Live – https://t.co/B4XZw382cM… #INDvPAK pic.twitter.com/6FII0XRTRu
— BCCI (@BCCI) September 2, 2023
वनडे क्रिकेटमध्ये सलग चौथं अर्धशतक
इशान किशनने मागच्या चार वनडे इनिंगमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील तिन्ही वनडे सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेत 46 चेंडूत 52 धावा, दुसऱ्या वनडेत 55 चेंडूत 55, तिसऱ्या वनडेत 64 चेंडूत 77 आणि आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.