Asia Cup 2023 | टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव! नक्की कारण काय?
Pakistan Name On India Jersey | टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असलेले असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबई | आशिया कप 2023 चं काउंटडाऊन सुरु झालंय. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया,पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. आशिया कपचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात आलं आहे. त्यानुसार श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 13 सामने होणार आहेत. त्यापैकी 9 सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. तर उर्वरित 4 मॅचेस या पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.
पीसीबीने आशिया कपसाठी 17 सदस्यीय संघ 9 ऑगस्टला जाहीर केला. तर बीसीसीआय कधीही भारतीय संघाची घोषणा करु शकते. या आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल दिसणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तान अशा नावाचा उल्लेख असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असण्यामागचं कारण काय, हे आपण जाणून घेऊयात.
आशिया कपचं संयुक्तिक यजमनापद हे पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे या स्पर्धेतील एकूण 6 सहभागी संघाच्या जर्सीवर ‘आशिया कप 2023 पाकिस्तान’ असा उल्लेख असणार आहे. याआधी 2022 मध्ये श्रीलंकेत आशिया कप स्पर्धा खेळवण्यात आली. तेव्हा जर्सीवर श्रीलंका असं नाव प्रिंट करण्यात आली होती.
बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे एसीसीने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये हायब्रिड पद्धतीने स्पर्धेचं आयोजन केलं. त्यानुसार, टीम इंडिया आपले सर्व सामने हे श्रीलंकातच खेळणार आहे.
दरम्यान टीम इंडियाची आशिया कपसाठी केव्हा घोषणा होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय 16-17 ऑगस्ट दरम्यान भारतीय संघ जाहीर करु शकते.
आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम
बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.