Asia Cup 2023 : भारत पाकिस्तान सामन्यात पावसाचं नो टेन्शन! एशियन क्रिकेट काउंसिलने घेतला मोठा निर्णय
Asia Cup 2023, India Vs Pakistan : आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील सामने सुरु झाले आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय पाहता एशियन क्रिकेट काउंसिलने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेचं आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकेत करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यातील पाकिस्तानातील सर्व सामने पार पडले असून आता श्रीलंकेत सामने होणार आहे. पण श्रीलंकेत पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यांवर विरजन पडल्याच चित्र आहे. भारत पाकिस्तान सामन्यात पाऊस पडल्याने हा सामना रद्द करण्यात आला होता. सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. पण या सामन्यावरही पावसाचं संकट असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एशियन क्रिकेट काउंसिलने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
एशियन क्रिकेट काउंसिलने घेतला असा निर्णय
भारत पाकिस्तान सामना 10 सप्टेंबरला झाला नाही तर पुढच्या दिवशी खेळवला जाणार आहे. एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच 17 सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठीही एक दिवस राखीव ठेवला आहे. ठरलेल्या दिवशीच सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. पण सामना पावसामुळे मधेच थांबवावा लागला तर राखीव दिवशी सामना थांबवला तेथूनच सुरु होईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीतील पहिला सामना पल्लीकेलेमध्ये झाला होता. भारताचा डाव झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर भारत नेपाळ सामन्यातही पावसाने व्यत्यय आला होता. त्यामुळे भारताला नेपाळने दिलेलं आव्हान 23 षटकात पूर्ण करण्याचं आव्हान दिलं गेलं.
केएल राहुल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार?
विकेटकीपर फलंदाज इशान किशन सध्या चांगल्या फॉर्मात आहे. सलग चार वनडे सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचं स्थान निश्चित आहे. त्यामुळे फिट झालेल्या केएल राहुल याला कसं स्थान मिळेल असा प्रश्न विचारला जात आहे. श्रेयस अय्यरच्या जागेवर स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान विरुद्ध चुकीचा फटका मारून बाद झाला होता. तर नेपाळ विरुद्धच्या सामन्यात बॅटिंगची संधी मिळाली नव्हती.
आशिया कपसाठी भारतीय स्क्वॉड: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.