Ind Vs Pak : पाकिस्तानचा वनडे वर्ल्ड कप न खेळण्याचा निर्णय, भारताच्या ‘या’ निर्णयाने रडीचा डाव
भारताने घेतलेल्या त्या निर्णयामुळे पाकिस्तानचा जळफलाट झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा रडीचा डाव सुरु केला आहे. पाकिस्तानने नक्की काय केलंय, जाणून घ्या.
इस्लामाबाद : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह पीसीबी चेयरमन यांच्यात 4 फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीत आशिया कप 2023 स्पर्धेचं ठिकाण बदलण्याच्या निर्णयाला पाकिस्तानची सहमती असल्याचं म्हटलं जात होतं. थोडक्यात काय तर टीम इंडिया पाकिस्तानात आशिया कपसाठी जाणार नाही. मात्र आता पाकिस्तानने आपल्या नेहमीचा रडीचा डाव सुरु केलाय. जर आशिया कपचं ठिकाण बदललं तर वर्ल्ड कप खेळणार नाही, असा फुसका बार सोडला आहे.
जर आशिया कपचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी करण्यात आलं तर पाकिस्तान भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, असं पीसीबीने म्हटलंय. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे.
बहरीनमध्ये शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी बैठक झाली. या बैठकीत आशिया कप स्पर्धेचं आयोजन कुठे करायचं, याबाबतचा निर्णय हा मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीत घ्यायचं ठरलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप स्पर्धेच्या त्रयस्ठ ठिकाणी आयोजनाच्या चर्चांबाबत पाकिस्तान नाखूश आहे. आशिया कपच्या यजमानपदासाठी यूएईचं नाव आघाडीवर आहे. पण असं झालं तर पाकिस्तान भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळणार नसल्याचीच धमकी दिली आहे.
पाकिस्तानने अशा धमक्या देण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी पीसीबीचे माजी चेयरमन रमीज राझानेही आशिया कपचं आयोजन दु्सऱ्या ठिकाणी केल्यास भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधून माघार घेणार असल्याची धमकी दिली होती.
आता आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे कुठे होणार, याबाबतचा अंतिम निर्णय हा मार्चमध्ये होणार आहे. मार्च महिन्यात आशिया क्रिकेट काउन्सिलची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल. या निर्णयावरुन ठरेल की टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की यूएईत आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार.
दरम्यान दुसऱ्या बाजूला आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलंय. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघ एकमेकांसमोर 12 फेब्रुवारी 2023 रोजी उभे ठाकणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे.